गावाच्या लसीकरणासाठी सरसावले सरपंच….

 

आसगावचे सरपंच प्रशांत बोरकर, चिचोलीचे सरपंच प्रमोद प्रधान यांचा लसीकरणात पुढाकार

भंडारा, दि. 27 :- गाव करी ते राव न करी, अशी मराठीत एक म्हण आहे. मात्र लसीकरणामध्ये पवनी तालुक्यातील आसगाव व लाखांदूर तालुक्यातील भगाटीने घेतलेली आघाडी पाहता खरोखरच गावाने जर निश्चय केला तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही हे सिद्ध होते. आसगावचे सरपंच प्रशांत बोरकर, चिचोलीचे सरपंच प्रमोद प्रधान यांनी लसीकरणात घेतलेल्या पूढाकाराने या गावांनी लसीकरणात आघाडी घेतली आहे.

जिल्ह्यात सध्या कोरोना विषयक लसीकरणासाठी विशेष लसीकरण मोहीम मिशन लेफ्ट आउट सुरू आहे. या मोहिमेत ज्यांचे लसीकरणाचे पहिले डोस व दुसरा डोस प्रलंबित आहे अशा लोकांना त्यांच्या घरोघरी जावून लसीकरण करण्यात येत आहे. आसगावचे सरपंच प्रशांत बोरकर व ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी यासाठी जाणीवपुर्वक प्रयत्न केले. त्यामुळे आसगावमधील पहिला डोस घेतलेल्यांचे प्रमाण 100 टक्के तर दुसरा डोस घेतलेल्यांचे प्रमाण 98 टक्के आहे. अर्थात याचे सर्व श्रेय ग्रामपंचायत सदस्यांचे आहे.
विशेष लसिकरण मोहिमेत आज जिल्ह्यातील सर्व महत्त्वाची व मोठी बाजारपेठ असलेल्या गावांमध्ये सुद्धा तिथे जावून लसीकरण करण्यात आले. तसेच लसीकरणासाठी टाळाटाळ करणाऱ्या वेगवेगळ्या क्षेत्रातील कामगार, मजूर वर्ग, शेतकरी, असंघटित क्षेत्रात कार्यरत अनेक कामगारांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी तसेच मोबाईल व्हॅनद्वारे सुद्धा लसीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी प्रशासन कामाला लागले आहे. त्यामध्ये आज आसगावने उत्तम कामगिरी केली आहे. येथील सरपंच व सर्व सदस्यांनी लसीकरणाविषयी केलेल्या प्रचार-प्रसारामुळे गावात शंभर टक्के नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर दुसरा डोस 98 टक्के नागरिकांनी घेतला आहे. खरोखरच आसगावने आज जिल्हावासीयांच्या समोर एक आदर्श ठेवला आहे. ज्या नागरिकांचे प्रलंबित डोस आहे त्यांनी तातडीने लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन भंडारा जिल्हा प्रशासनाने केले आहे.
लाखांदुर तालूक्यातील चिचोलीचे सरपंच प्रमोद प्रधान, भगाटी गावचे सरपंच ताराचंद मातेरे यांनी देखील लसीकरणासाठी उत्तम काम केले आहे.