जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर पंचायत निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज  उद्या सकाळी 7.30 वाजेपासून मतदानाला सुरुवात

 

जिल्हा परिषदेच्या 39 तर पंचायत समितीच्या 79 निर्वाचक गणांसाठी मतदान

एकूण 7 लक्ष 68 हजार 866 मतदार बजावणार हक्क

भंडारा, दि. 20 : जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक करिता 21 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 वाजेपासून मतदानाला सुरुवात होणार आहे. जिल्हा परिषदेच्या 39 तर पंचायत समितीच्या 79 निर्वाचक गणांसाठी 1322 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. एकूण 7 लक्ष 68 हजार 866 मतदार मतदान करतील. त्यापैकी 3 लक्ष 89 हजार 130 पुरुष तर 3 लक्ष 79 हजार 736 महिला मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. जिल्हा परिषदेसाठी एकूण 245 उमेदवार नशिब आजमावत असून पंचायत समितीसाठी 417 उमेदवार रिंगणात आहेत. जिल्हा परिषदेच्या 245 उमेदवारांपैकी 109 स्त्री तर 136 पुरुष उमेदवार आहेत. पंचायत समितीसाठी 417 उमेदवारांपैकी 228 पुरुष तर 189 स्त्री उमेदवार आहेत.
26 नोव्हेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणूक कार्यक्रम घोषित केला होता. त्यानुसार नामनिर्देशनपत्रे 1 ते 6 डिसेंबर या कालावधीत स्वीकारले. 7 डिसेंबर 2021 रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी झाली. 13 डिसेंबर रोजी अंतिम उमेदवार यादी प्रकाशित झाली.
निवडणुकीच्या दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह 1870 पोलीस कर्मचारी व 700 होमगार्ड व एसआरपीएफच्या तीन तुकड्या तयार आहेत. तुमसर व लाखांदूर तालुक्यात 10 संवेदनशील व 2 अतिसंवेदनशील तर नक्षल प्रभावित मतदान केंद्राची संख्या 17 आहे. 17 डिसेंबर पर्यंत निवडणुकीच्या अनुषंगाने उत्पादन शुल्क विभागाने 12 लक्ष 15 हजार 714 रुपये किंमतीचा 27 हजार 940 लिटर मद्यसाठा जप्त केला. पोलीस विभागाने 14 शस्त्र परवाने जमा केले तर 132 व्यक्तींना स्थानबध्द केले. निवडणूक मतदान प्रक्रिया खुल्या, निर्भय, शांततामय, वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीने जिल्ह्यांमध्ये या सर्व मतदान केंद्राच्या ठिकाणी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये मनाई आदेश निर्गमित करण्यात आले आहे.
निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचार संहिता पालन करणे व त्यासंबंधाने तक्रारीचे निराकरण करण्यास्तव जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्ह्यातील सर्व निवडणुक निर्णय अधिकारी यांच्यास्तरावर तक्रार निवारण नियंत्रण केंद्र स्थापित करण्यात आले आहे. जिल्हा परिषद व त्याअंतर्गत पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, गोंदिया सामाजिक न्याय विभागाचे उपायुक्त मंगेश वानखेडे, सहाय्यक वनसंरक्षक भंडारा राजेंद्र सदगिरे यांची मुख्य निवडणूक निरीक्षक/निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच मतदार मतदानापासून वंचित राहू नये याकरिता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राज्यातील इतर सर्व आस्थापना व बँका (ज्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेली स्थानिक सुट्टी लागू होत नाही) यांच्या आस्थापनेवरील अधिकारी-कर्मचाऱ्यांना मतदान करता येणे शक्य व्हावे, याकरिता संबंधित आस्थापनांनी कामाच्या तासामधून दोन तासाची सवलत देण्यात यावी, असे आदेश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी निर्गमित केले आहेत. निवडणुकीसाठी आज सर्व मतदान पथके मतदान साहित्यासह रवाना झालेली आहेत.
मोहाडी, लाखनी व लाखांदूर या तीन नगरपंचायतीसाठी एकूण 167 उमेदवार रिंगणात आहे. 41 मतदान केंद्रांवर उद्या एकूण 22 हजार 896 मतदार मतदानाचा हक्क बजावतील.