चार नगरपंचायतींच्या सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षण सोडत

वर्धा, दि. 17  : जिल्ह्यातील चार नगर पंचायतींसाठी निवडणूक प्रक्रीया सुरु आहे. सर्वोच्च न्यायालयाने नागरीकांच्या मागास प्रवर्गाचे आरक्षण अनारक्षित केल्याने या नगरपंचायतींमधील नामाप्रच्या जागांवर सर्वसाधारण व सर्वसाधारण महिलांचे आरक्षण निश्चित करण्यासाठी दि.23 डिसेंबर रोजी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.
जिल्ह्यात आष्टी, कारंजा (घा.), सेलु, समुद्रपुर या चार नगर पंचायतींसाठी निवडणूक प्रक्रीया सुरु आहे. सर्वोच्च न्यायालयाने नामाप्रच्या जागा अनारक्षित केल्याने नामाप्रच्या स्थगित ठेवण्यात आलेल्या जागांसाठी सर्वसाधारण प्रवर्गातून निवडणूक घेण्यात येणार आहे. त्यासाठी सर्वसाधारण व सर्वसाधारण महिलांच्या राखीव जागांसाठी आरक्षण काढण्यात येणार आहे. आयोगाने दिलेल्या कार्यक्रमानुसार यासाठी दि.20 डिसेंबर रोजी अधिसुचना प्रसिध्द केली जाणार आहे. दि.23 डिसेंबर रोजी महिला आरक्षण निश्चित करण्यासाठी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.
आष्टी व कारंजा येथे पंचायत समिती सभागृह येथे तर सेलू येथे शिवपार्वती सभागृत तसेच समुद्रपुर येथे विद्याविकास महाविद्यालयाच्या सभागृहात आरक्षण काढण्यात येईल. चारही ठिकाणी दुपारी 12 वाजता आरक्षण काढल्या जातील. आरक्षण सोडतीचा अहवाल दि.24 डिसेंबर रोजी विभागीय आयुक्त तथा नगर परिषद प्रशासनच्या प्रादेशिक संचालकांना पाठविला जातील. दि. 27 डिसेंबर रोजी आरक्षणास अंतीम मान्यता देण्यात येतील. दि.28 डिसेंबर रोजी अंतिम अधिसुचना प्रसिध्द केली जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले आहे.