
जिल्ह्यातील तिवसा मतदार संघातील वाघोली येथील शेतकऱ्यांना पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांच्या प्रयत्नांनी न्याय मिळाला. रतन इंडिया पावर प्लांटच्या धुळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अखेरीस नुकसान भरपाई देण्यात आली.
अमरावती तालुक्यातील नांदगाव पेठ जवळील वाघोली येथील शेतकरी गेल्या तीन वर्षांपासून त्रस्त होते. रतन इंडिया पावर प्लांट मुळे या शेतकऱ्यांच्या शेतात धुळीचे साम्राज्य पसरले होते. या धुळीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत होते. पिके जमीनदोस्त झाली होती. यासंदर्भात जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्याकडे शेतकरी वारंवार तक्रार करीत होते. श्रीमती ठाकूर यांनी रतन इंडिया पावर प्लांट सातत्याने संपर्क साधून या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून दिली.
सहा शेतकऱ्यांना सुमारे तीन लाख आठ हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे. जया ठेले यांना 90 हजार रुपये, ओमकार ठेले यांना 87 हजार 840 रुपये, सुरेश कांबळे यांना चाळीस हजार पाचशे रुपये, सुखंलाल चव्हाण यांना 34 हजार दोनशे रुपये, छबुलाल चव्हाण यांना 44 हजार 300 रुपये आणि ज्ञानेश्वर इंगोले यांना 14 हजार 400 रुपये मदत देण्यात आली आहे शेतकऱ्यांना मदत मिळाल्याबद्दल पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी समाधान व्यक्त केले आहे.