शेतकऱ्यांसाठी खुशखबर शेतकऱ्यांना कर्ज मिळणे सोपे होणार

 

शेतकऱ्यांची शेतीची आणि इतर कामे खोळंबणार नाहीत आणि कर्जासाठी वारंवार बँकाच्या पायऱ्याही झिजवाव्या लागणार नाहीत. शेतकऱ्यांना कर्ज मिळणे सोपे होणार आहे. देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने देशातील शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी अदानी कॅपिटलशी हातमिळवणी केली आहे. ही शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. अलीकडेच, SBI ने शेतकऱ्यांना ट्रॅक्टर आणि कृषी यंत्रांच्या खरेदीसाठी कर्ज देण्यासाठी अदानी समूहाची NBFC शाखा अदानी कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड सोबत करार केला आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया NBFC च्या सहकार्याने कर्ज देईल. बँकेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “या भागीदारीमुळे एसबीआय पिकांची उत्पादकता वाढवण्यासाठी कृषी यंत्रे खरेदी करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना कर्ज देऊ शकेल. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी SBI अनेक NBFCs सोबत सहकार्य करून कर्ज देण्याची प्रक्रिया वाढवण्याचा प्रयत्न करत आहे.