जिल्ह्यातील कोरोनाच्या निर्बंधाचे योग्य पद्धतीने पालन झाल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून कोरोना नियंत्रणात आहे. त्यामुळे प्रशासनाने बरेच निर्बंध शिथिल केले आहेत. मात्र, आता कोरोनाच्या ओमायक्रॉन या नवीन विषाणूच्या प्रादुर्भावाची शक्यता पाहता,
जिल्हा प्रशासनाने साथरोग प्रतिबंधक कायद्यानुसार नवीन आदेश काढून काही निर्बंध लागू केले आहेत. नवीन आदेशानुसार, पुन्हा सार्वजनिक ठिकाणी मास्क लावल्याशिवाय आणि लस घेतल्याशिवाय वावरण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे, याशिवाय इतरही अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत.
जिल्हाधिकारी संजय मिना यांनी जिल्हा दंडाधिकारी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष या नात्याने नवीन निर्बंधाबाबत ३० नोव्हेंबरला आदेश जारी केला.
तिकीट असलेल्या किंवा तिकीट नसलेल्या कोणत्याही कार्यक्रमात, समारंभाला किंवा प्रयोगाच्या आयोजनाशी संबंधित सर्व व्यक्ती, तसेच सर्व सेवा प्रदाते, तसेच कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या सर्व व्यक्तींना संपूर्ण लसीकरण झाल्याशिवाय प्रवेश राहणार नाही.
कोणतेही दुकान, आस्थापना, मॉल, समारंभ, संमेलन (मेळावे) इत्यादी ठिकाणी, संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींद्वारे व्यवस्थापन केले पाहिजे आणि अशा ठिकाणी येणारे सर्व अभ्यागत, ग्राहक यांचेही संपूर्ण लसीकरण झालेले असावे.
सार्वजनिक परिवहन सेवांमध्ये संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींनाच परवानगी असेल. राज्य शासनाने तयार केलेला युनिव्हर्सल पास हा संपूर्ण लसीकरण झाल्याच्या स्थितीचा वैध पुरावा असेल.
याशिवाय छायाचित्र असलेले कोविन प्रमाणपत्रही त्यासाठी वैध पुरावा मानला जाईल.