नागपूर, ता. २३ : स्त्री शिक्षणाच्या पुरस्कर्त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपूरच्या वतीने राज्यातील प्रत्येक जिल्हास्तरावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षीस प्रदान करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे या स्पर्धेसाठी स्पर्धकांना २७ डिसेंबरपर्यंत स्वत: लिहिलेले निबंध आपल्या जिल्ह्याच्या टॅबवर अपलोड करावे लागणार आहे.
स्पर्धेसाठी ‘सावित्रीबाई फुले आणि सार्वत्रिक शिक्षण’, ‘स्री-पुरुष समानता आणि सावित्रीबाई फुले यांचे विचार’ आणि ‘पहिल्या भारतीय स्त्रीवादी विचारवंत : सावित्रीबाई फुले’ हे तीन विषय असून यापैकी कुठल्याही एका विषयावर स्पर्धकांना स्वत:च्या हस्ताक्षरामध्ये मराठी भाषेतच निबंध लिहावे लागणार आहे. स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवीचे शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना सहभागी होता येईल. निबंधासाठी शब्दमर्यादा १००० एवढी आहे. स्पर्धेत दिलेला निबंध हा विद्यार्थी शिकत असलेल्या महाविद्यालयाचा प्राचार्यांनी प्रमाणित केलेला असावा किंवा चालूवर्षाच्या ओळख पत्राच्या प्रतिसह अपलोड करावा लागेल. स्पर्धेची शेवटची तारीख २७ डिसेंबर २०२० सायंकाळी ५ वाजतापर्यंत आहे. स्पर्धकांनी निबंधाच्यावर स्वत:चे पूर्ण नाव, जन्म दिनांक, महाविद्यालयाचे नाव व जिल्हा लिहणे आवश्यक आहे. जिल्हास्तरावरील पारितोषिक प्राप्त निबंधांना महाज्योती कडून विस्तृत प्रसिद्धी देण्यात येणार आहे. स्पर्धेसंबंधी अधिक माहितीसाठी स्पर्धा समन्वयक श्री उमेश कोर्राम यांच्याशी ८९२०९३६८७० या क्रमांकावर अथवा studentrights.ind@gmail.com या ईलेवर संपर्क साधावा.
विजेत्यांना रोख पारितोषिक
निबंध स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांना रोख पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहेत. स्पर्धेमध्ये क्रमांक पटकाविणा-या स्पर्धकाला १० हजार रुपये रोख बक्षीस प्रदान करण्यात येणार आहे. द्वितीय क्रमांक प्राप्त करणा-या स्पर्धकाला ५ हजार रुपये व तृतीय क्रमांक पटकाविणा-या स्पर्धकाला अडीच हजार रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे.