पालकमंत्र्यांकडून शहरात विविध ठिकाणी भेटी; नागरिकांना शांततेचे आवाहन

 

अमरावती, दि. १३ : समाजातील सर्व घटकांनी अमरावती शहरात एकोपा व शांतता राखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज केले. पालकमंत्र्यांनी आज शहरात ठिकठिकाणी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली व शांततेचे आवाहन केले.

शहरातील घटनांच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री श्रीमती ठाकूर या आज सकाळपासून जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासनासमवेत उपस्थित राहून परिस्थितीवर लक्ष ठेवून होत्या. त्यांनी यावेळी पोलीस व जिल्हा प्रशासनाशी चर्चा केली व परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

पालकमंत्र्यांनी शहरात सक्करसाथ, इतवारा, वसंत चौक, ऑटो गल्ली, वलगाव रोड, जमिल कॉलनी आदी विविध परिसराला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली व सर्वांना शांततेचे आवाहन केले.

अमरावती शहर हे सांस्कृतिक लौकिक असलेले शहर आहे. विविध नवनव्या उद्योगांच्या उभारणीमुळे औद्योगिक शहर म्हणून विकसित होत आहे. अशा शहरात तोडफोड, दगडफेकीच्या घटना घडणे अनुचित आहे. शांततेचा भंग करणे, अफवा पसरवणे आदी प्रकार घडविणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई केली जाईल. सामान्य माणसाला वेठीस धरण्याचा प्रयत्न करू नये, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

सर्वपक्षीय नेत्यांनी शांतता निर्माण करण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.आमदार सुलभाताई खोडके,संजय खोडके, माजी आमदार वीरेंद्र जगताप, जगदीश गुप्ता, दिनेश बूब, विलास इंगोले, बबलू शेखावत, जयंतराव देशमुख, अपर जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

त्यानंतर पालकमंत्र्यांनी पोलीस आयुक्त कार्यालयात जाऊन पोलीस प्रशासनाशी चर्चा केली व काटेकोर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी निर्देश दिले. प्रभारी पोलीस आयुक्त संदीप पाटील व इतर अधिकारी उपस्थित होते.
पोलीसांतर्फे ठिकठिकाणी बंदोबस्त लावण्यात आला आहे. राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या तैनात आहेत. परिस्थिती नियंत्रणात आहे.