प्रहार च्या दणक्याने आता आर्वी तळेगाव रस्त्याचा वनवास संपणार खासदार तडस यांनी बाळा जगताप यांच्या उपस्थितीत बोलावली अधिकाऱ्यांची बैठक

 

आर्वी :- दि. ९ नोव्हेंबर रोजी तीन ते चार वर्षापासून रेंगाळलेले आर्वी ते तळेगाव महामार्गाचे काम मार्गी लागावे म्हणून प्रहार चे बाळा जगताप यांनी आठ दिवसात जर सदर काम चालू झाले नाही तर खासदार रामदास जी तडस यांच्या निवासस्थानी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

प्रहार च्या व बाळा जगताप यांच्या आंदोलनांची पार्श्वभूमी बघता खासदार रामदास जी तडस यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ११ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३४७ अ आर्वी तळेगाव या मार्गाच्या रखडलेल्या कामासंदर्भात बैठक घेण्यात आली.

सदर बैठकीला कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग नागपूर विभाग श्री. एन. व्ही. बोरकर, सहाय्यक अभियंता राष्ट्रीय महामार्ग वर्धा श्रीमती नंदिनी गुर्वे, सर्वेअर श्री. मुकेश कानचंदानी, पि. एम. ए. चे व्यवस्थापक श्री. मयांक अग्रवाल हे उपस्थित होते. सदर बैठक ही प्रहार चे नेते बाळा जगताप यांच्या विशेष उपस्थितीत संपन्न झाली.

बाळा जगताप यांनी आर्वी ते तळेगाव या महामार्गाच्या रखडलेल्या बांधकामासंदर्भात खासदार श्री. रामदास जी तडस यांना निवेदन देत आठ दिवसात सदर कामासंदर्भात तोडगा न निघाल्यास खासदारांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

सदर बैठकीमध्ये कंत्राटदाराने १२ नोव्हेंबर २०२१ पासून सदर रोड वर पाणी मारणे आणि एकतर्फी रस्ता खुला करून देण्यात येईल. तसेच १२ नोव्हेंबर पासूनच मुरूम टाकण्याचे काम सुरू करण्यात येईल. व १६ नोव्हेंबर पासून रखडलेल्या पुलाचे काम सुरू करून मार्च २०२२ पर्यंत संपूर्ण रस्त्याचे काम पूर्ण करण्यात येईल असे आश्वासीत केले. जर दिलेल्या आश्वासनाप्रमाणे काम होत नसेल तर १५ दिवसांनी आम्ही पुन्हा आंदोलनात्मक पवित्रा घेऊ असे बाळा जगताप यांनी ठणकावून सांगितले