एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी बसपा-अँड.संदीप ताजने

११ नोव्हेंबर २०२१

एसटी कामगारांच्या आत्महत्या आणि त्यांच्या कुटुंबियांची होणारी आर्थिक वाताहत थांबवायची असेल, तर एसटी महामंडळाला राज्य सरकारमध्ये विलनीकरण करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. या मागणीसाठी आंदोलन करीत असलेल्या एसटी कामगारांच्या संपाला बहुजन समाज पार्टीचा पुर्ण पाठींबा आहे. महाविकास आघाडी सरकारच्या अन्यायकारी धोरणाविरोधात बसपा आंदोलकांच्या समर्थनार्थ खंबीरपणे उभी आहे, असे आश्वासन प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजने यांनी गुरूवारी आंदोलकांना दिले.

सर्वसामान्यांप्रमाणे एसटी कामगारांचेही महाविकास आघाडी सरकार शोषकवृत्तीने शोषण करीत आहे. न्याय मागण्यांसाठी दाद मागणाऱ्या एसटी कामगारांकडे सरकार दुर्लक्ष करीत आहे. तुटपुंज्या पगारावर गेली कित्येक वर्ष एसटी कामगार बांधव काम करीत आहे. पंरतु, कुठल्याही सरकारला मायेचा पाझर फुटला नाही. पगारवाढ आणि वाढीव महागाई भत्याच्या न्याय मागण्यांसाठी आंदोलनाचे अस्त्र उगारणाऱ्या आंदोलकांची भूमिका चुकीची नाहीच, अशी भावना अँड.ताजने यांनी व्यक्त केली.

यामुळे एस.टी कामगारांना २८% महागाई भत्ता आणि वाढीव घरभाडे भत्ता देण्यासह जोपर्यंत एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण होत नाही तोपर्यंतच्या लढ्यात बसपा आंदोलकांसोबत आहे, असे आश्वासन यानिमित्ताने अँड.संदीप ताजने यांनी आंदोलकांना दिले .कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून आतापर्यंत राज्यातील तब्बल ३४ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. अशात सरकारने एसटी कामगारांबद्दल सहानुभूती दाखवत त्यांच्या मागण्या मान्य कराव्या,असे आवाहन अँड.ताजने यांनी केले आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे मात्र सर्वसामान्य प्रवाशांचे हाल होत आहे. खासगी बस चालकांकडून प्रवाशांकडून अवाजव तिकिट वसूल केले जात आहे. अशात सर्वसामान्यांचे हित लक्षात घेता एसटी कर्मचारी आणि सरकारने आपसी संमजस्यातून मध्यम मार्ग काढण्याचे आवाहन देखील अँड.ताजने यांनी केले आहे.