आझादी का अमृत महोत्सव उपक्रमात पुढील काळात विविध कार्यक्रम आयोजित करावयाचे असून, अभिनव संकल्पनांचा वापर करून हा उपक्रम राबवावा, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल यांनी येथे दिले.
महोत्सवात कार्यक्रमाच्या आखणीबाबत चर्चा आज जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम टेकाळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
श्री. बिजवल म्हणाले की, महोत्सवात निर्धारित लोगोचा वापर सर्वांनी पत्रव्यवहारात करावा. सर्व कार्यालयांनी आपल्या नियोजनाचा प्रस्ताव सादर करावा. स्वातंत्र्यचळवळीच्या अनुषंगाने जिल्ह्याशी संबंधित घटनास्थळे, इतिहास आदींचे दर्शन घडविणारे कार्यक्रम आयोजित करावेत. अशा कार्यक्रमांतून इतिहासाचे स्फूर्तीदायक दर्शन घडविताना त्याचे आयोजन कल्पक पद्धतीने करावे. देशभक्तीपर गीतांच्या सुरावटी सादर करण्यासाठी पोलीस बँड पथकाचा समावेश प्रत्येक कार्यक्रमात करावा. महोत्सवाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा, तालुका, महानगर, शहर व गाव स्तरावर समित्या गठित कराव्यात. सर्व विभागांनी समन्वयाने कामे करावीत, असे निर्देश त्यांनी दिले.