धान्याचा काळाबाजार करणाऱ्या जांभिया येथील दुकानदाराचा परवाना रद्द करा वडेट्टीवारांकडे निवेदनातून मागणी

 

 

एटापल्ली तालुक्यातील जांबिया येथील राशन दुकानदाराला धान्याचा काळाबाजार करताना नागरिकांनी रंगेहाथ पकडले होते. त्यामुळे या दुकानाचा परवाना रद्द करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य तथा तालुका काँग्रेस अध्यक्ष संजय चरडुके व नागरिकांनी बहुजन कल्याण, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वड्डेटीवार यांच्याकडे निवेदनातून केली आहे. हे रास्त धान्य दुकान परिमल गाईन यांच्या नावाने मंजूर आहे. संबंधित दुकानदारास एका वाहनातून (क्र. एमएच ३३ जी २४४६) २७ पोते धान्याची अफरातफर करताना नागरिकांनी रंगेहाथ पकडले होते. प्रशासकीय कार्यवाहीसाठी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले होते. प्रशासनाने कार्यवाही करुन परिमल गाईन यांचा रास्त धान्य परवाना निलंबित केला होता. त्यानंतर मात्र आठ महिन्यांत कार्यवाही शिथिल करून परवाना कायम करण्यात आला आहे. परिमल गाईन हे पुन्हा धान्याचा काळाबाजार करीत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडील दुकानाचा परवाना कायमचा रद्द करावा, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य संजय चरडुके, पंचायत समिती सदस्य बेबी लेकामी, सरपंच राजू नरोटी, निजान पेंदाम, किशोर हिचामी, मंगेश उसेंडी, संजय पुंगाटी, चेतन हिचामी, रैनू पुंगाटी, राजू हिचामी, कोपा हिचामी, किसन हिचामी, चंपत करमरकर, कृष्णा नैताम, अमर हिचामी, चमरू हिचामी, कोलू हिचामी यांनी केली आहे.