स्वातंत्र्याच्या अनेक वर्षा नंतरही एटापल्ली तालुका विकासापासून कोसो दूर  

 

 

स्वतंत्र मिळून अनेक वर्षे लोटून गेली परंतु एटापल्ली तालुका आजही विकासापासून कोसो दूर आहे. मूलभूत सुविधांअभावी तालुक्यातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सध्याच्या परिस्थितीत एटापल्ली तालुक्यातील रस्ते पूर्णतः जीर्ण झाले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. एटापल्ली हे आदिवासीबहुल, नक्षलग्रस्त, अविकसित, अत्यंत दुर्गम तहसील म्हणून ओळखले जाते. या तालुक्यापर्यंत मूलभूत सुविधा अद्याप पोहोचलेल्या नाहीत. शिक्षण, आरोग्य, पाणी, वीज, रस्ते आदी मूलभूत सुविधांची कमतरता आजही गावांमध्ये दिसून येत आहे. तालुका मुख्यालयासह काही गावांपर्यंत रस्ते जोडली आहेत. तर अनेक गावांपर्यंत जाण्यासाठी अजूनही रस्तेच नाही. तालुक्यात असलेल्या अनेक रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. एटापल्ली-जारावंडी या मुख्य मार्गाची हालत गंभीर आहे. या मार्गावरील हालेवारा, कसनसूर ही दोन तालुक्याची प्रमुख गावे आहेत. मात्र, रस्त्याच्या दुरवस्थेमुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी डांबर उखडले आहे. आणि गिट्टीही पसरली आहे. त्यामुळे कधीही अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे रस्त्यांची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.