
कोरची तालुक्यातील कुरखेडा येथून कोरचीकडे जाणाऱ्या रस्त्याची मोठ्याप्रमाणावर दुरवस्था झाली होती. त्यामुळे या रस्त्यावरून मार्गक्रमण करण्यासाठी नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता.
रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती करण्यासाठी आमदार कृष्णा गजबे यांनी सातत्याने संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला. त्यामुळे सदर रस्ता दुरुस्तीकरणास सुरुवात झाली असून आमदार गजबे यांनी कामाची पाहणी केली. कुरखेडा-कोरची मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते.
पावसाळ्याच्या दिवसात खड्डयात पाणी साचुन राहत असल्याने मार्गक्रमण करणे अडचणीचे जात होते. कोरची येथून गडचिरोली जिल्हा केंद्राकडे व इतर ठिकाणी जाण्यासाठी कोरची तालुक्यातील हा मुख्य रस्ता आहे. या रस्त्यावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. अनेक महिन्यांपासून या रस्त्याची दूरवस्था झाली असून सुद्धा दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत होते. त्यामुळे संबंधित विभागाने नागरिकांची रस्त्याची समस्या दूर करावी, यासाठी आमदार कृष्णा गजबे यांनी पाठपुरावा केला. संबंधित विभागाने अखेर सदर रस्ता दुरुस्ती कामास प्रारंभ केल्याने परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. यावेळी भाजयुमो जिल्हा अध्यक्ष चांगदेव फाये, सामाजिक कार्यकर्ते विलास गावंडे, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.