एसटी महामंडळाचे हित व प्रवाशांची सोय लक्षात घेता एसटीच्या संपावरील कर्मचा-यांनी संप मागे घ्यावा : शरद पवार

 

एसटी महामंडळाचे हित व प्रवाशांची सोय लक्षात घेता एसटीच्या संपावरील कर्मचा-यांनी संप मागे घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले आहे. आज त्यांनी बारामतीत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी याबाबत भाष्य केलं. एसटी सध्या अडचणीत आहे याची जाणीव एसटीच्या कर्मचा-यांनाही आहे, अशा स्थितीत थोडी संयमाची भूमिका घेणे गरजेचे आहे असंही त्यांनी सांगितली.

पुढं बोलताना पवार म्हणाले, ज्यांच्या हातात एसटीची संघटना आहे, त्या पैकी काही जणांनी माझी भेट घेतली. त्यांनी असे सांगितले की आम्हाला हा संप पुढे न्यायचा नाही, एसटी संकटात आहे याची जाणीव आम्हाला आहे, दिवाळीच्या काळात प्रवाशांना त्रास होऊ नये असे आमचे मत आहे. मात्र काही लोकांनी टोकाची भूमिका घेतली आहे, त्या मुळे हे घडते आहे, आज 80 टक्के एसटी रस्त्यावर आहे, माझे संपावरील कर्मचा-यांना आवाहन आहे की त्यांनी प्रवाशांचे हित लक्षात घेत हा विषय जास्त ताणू नये असंही ते म्हणाले.