ऑनलाईन धान विक्री करीता १० नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ आमदार गजबेंच्या पाठपुराव्यास यश

 

गडचिरोली-खरीप पणण हंगाम २०२२-२३ मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत शासकीय स्तरावरुन धान व भरडधान्य खरेदी संदर्भात शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करणे सक्तीचे करण्यात आले आहे. माञ पर्यायी सोयी सुविधांअभावी विहीत मुदतीत ऑनलाईन नोंदणी होऊ शकली नसल्याने शासकीय धान खरेदी केन्द्रावर धान विक्रीपासुन मोठ्या प्रमाणात शेतकरी वंचित राहण्याची शक्यता लक्षात घेता आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी शासनाकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले असुन धान विक्रीकरीता ऑनलाईन नोंदणीची १० नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
खरीप पणण हंगाम २०२२-२३ मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत धान व भरडधान्य खरेदीकरीता ऑनलाईन पोर्टलवर शेतकरी नोंदणीकरीता २१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.तथापी ऑनलाईन पोर्टलवरील माहितीनुसार व मागील हंगामाचा विचार करता शेतकरी नोंदणी पुरेशी झाल्याचे दिसून येत नाही.
यामुळे शासकीय धान खरेदी केन्द्रावर किमान आधारभूत किंमतीत धान विक्रीपासुन मोठ्या प्रमाणात शेतकरी वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही गंभीर बाब असुन यामुळे शेतकऱ्यांना जबर आर्थिक फटका बसण्याची शक्यता लक्षात घेता आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी या संदर्भात शासनाकडे मुदतवाढ देण्या संदर्भात पञ व्यवहार केला असता राज्याचे अवर सचिव संतोष कराड यांच्या स्वाक्षरीनिशी २० ऑक्टोबर रोजी १० नोव्हेंबर २०२२ पर्यंत ऑनलाईन नोंदणी मुदतवाढ देण्या संदर्भात पञ निर्गमित करण्यात आले आहे. यामुळे शेतकरी वर्गातून आमदार गजबे यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहे.