ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक-2022: मतदान व मतमोजणी केंद्राच्या 200 मीटर परिसरात जमावबंदी आदेश लागु

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक-2022:

मतदान व मतमोजणी केंद्राच्या 200 मीटर परिसरात जमावबंदी आदेश लागु

चंद्रपूर, दि. 13 ऑक्टोबर: ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक-2022 च्या अनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती, चिमूर, मुल, जिवती, कोरपना, राजुरा व ब्रह्मपुरी तालुक्यातंर्गत संबधित निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निश्चित केलेल्या मतदान केंद्रावर दि. 16 ऑक्टोबर 2022 रोजी मतदान होणार आहे. तर चंद्रपूर जिल्ह्यातील 94 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची मतमोजणी संबंधित तालुक्याच्या मुख्यालयी दि. 17 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

सदर निवडणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने दि. 16 व 17 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 6 वाजतापासून, मतमोजणी संपेपर्यंत उपरोक्त तालुक्यातील मतदान केंद्र व लगतच्या 100 मीटर परीसर व मतमोजणी केंद्राच्या 200 मीटर परिसरात फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम 144 अन्वये जमावबंदी आदेश लागू करण्यात येत आहे.

दि. 16 ऑक्टोबर मतदान केंद्र व लगतच्या 100 मीटर परीसरात तसेच 17 ऑक्टोबर रोजी मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी सकाळी 6 ते मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यंत मतमोजणी केंद्र व लगतच्या 200 मीटर परिसरात गर्दी होऊन सार्वजनिक शांततेस व अन्य हालचालींना प्रतिबंध करणे आवश्यक झाले आहे.

त्याअनुषंगाने दि. 16 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 6 ते मतदान प्रक्रिया संपेपर्यंत व 17 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 ते मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यंत चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती, चिमूर, मुल, जिवती, कोरपना, राजुरा व ब्रह्मपुरी तालुक्यातील मतमोजणी केंद्राच्या 100 व 200 मीटर परिसरात दोन किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती समूहात जमा होणार नाहीत. 100 व 200 मीटर परिसर व क्षेत्रांतर्गत सकाळी 6 ते मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यंत मतमोजणीशी संबंधित प्रत्यक्ष हालचाली व्यतिरिक्त इतर हालचालींना प्रतिबंध राहील. या कालावधीत मतमोजणी केंद्राच्या 100 व 200 मीटर परिसरातंर्गत मोबाईल, सेल्युलर फोन, कॉर्डलेस फोन, वायरलेस सेट आदी तसेच स्वयंचलित दुचाकी वाहने, व्हिडिओ चित्रीकरण, फोटोग्राफी व शस्त्रे इत्यादीस प्रतिबंध राहील.

सदर आदेश दि. 16 ऑक्टोबर रोजी उक्त मतदान केंद्रावर सकाळी 6 ते मतदान प्रक्रिया संपेपर्यंत तसेच 17 ऑक्टोबर 2022 रोजी मतमोजणी केंद्रावर सकाळी 6 ते मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यंत अमंलात राहील. सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती, इसम किंवा समूह प्रचलित कायदेशीर तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील. असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी अजय गुल्हाने यांनी निर्गमित केले आहे.