स्वयंसेवकांनी दत्तक घेतलेल्या गावात बालविवाह थांबविण्यास सहकार्य करावे” -जिल्हाधिकारी आंचल सूद गोयल

 

परभणी दि. 11 : जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण महाराष्ट्रात सर्वाधिक असून ते प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी आंचल सूद गोयल, जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांच्या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन आज करण्यात आले होते. यावेळी जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थी-विद्यार्थीनी यांची उपस्थिती होती. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेच्या सर्व विद्यार्थ्यांची बालविवाह प्रतिबंधक टीम तयार करून जिल्ह्यातील या स्वयंसेवकांना एक-एक गाव दत्तक देण्यात आले. तसेच आपला जिल्हा बालविवाह मुक्त करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी यावेळी केले.

या कार्यक्रमासाठी बाल हक्क आयोग सदस्य ॲड. संजय सेंगर, राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्या डॉ. आशाताई मिरगे, मानसोपचार तज्ज्ञ डॉ. जगदीश नाईक, सामाजिक आर्थिक विकास संस्था केरवाडी अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी, राष्ट्रीय स्वयंसेवक समन्वयक तुकाराम फिसफीसे, जिल्हा महिला बालविकास अधिकारी कैलास तिडके, जिपचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बालकल्याण विशाल जाधव, बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प आर.पी. रंगारी, बालविकास प्रकल्प अधिकारी ग्रामीण अरविंद आकात, अधीक्षक शासकीय मुलांचे बालगृह गोविंद अंधारे आदी मान्यवर या कार्यशाळेसाठी उपस्थित होते.