प्रतिनिधी // कृनाल राऊत
गडचिरोली-एटापल्ली : सुरजागड लोह खदानीवरुन गडचिरोली जिल्ह्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. स्थानिक नागरिक आणि आदिवासी खदानीविरोधात रस्त्यावर उतरले असून खदानीला विरोध करत आहेत. आज 29 ऑक्टोंबर रोजी पहाटे 6 वाजेच्या दरम्यान खदानीविरोधात एटापल्ली येथे ठिय्या आंदोलनाला बसलेल्या हजारो आदिवासी लोकांना हाकलून देण्यात आले असून, प्रमुख नेत्यांना पोलिसांनी अचानक अटक केल्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये जि.प. सदस्य सैनु गोटा, रामदास जराते, शिला गोटा आदींचा समावेश आहे.
गडचिरोली येथील सुरजागड लोहखदान प्रकल्पाविरोधात स्थानिक नागरिक आणि आदिवासी यांनी एल्गार पुकारला आहे. 25 ऑक्टोंबर रोजी तब्बल 8 ते 10 हजार आदिवासींनी एकत्र येत एटापल्ली येथे मोर्चा काढून प्रशासनाला खदान बंद करण्याबाबत निवेदन दिले होते. त्यानंतर जोपर्यंत खदान बंद होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही अशी भुमिका घेत बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु केले. आज ठिय्या आंदोलनाचा पाचवा दिवस असताना पोलिसांनी कारवाई करत आंदोलकांना अटक केली आहे.
या दरम्यान, गडचिरोली जिल्ह्यात एकुण 25 लोहखाणी प्रस्तावित आहेत. यापैकी सुरजागड येथे खदान सुरु झाली असून स्थानिक नागरिकांनी त्याला जोरदार विरोध केला आहे.