कुडो क्रीडा प्रकारातील गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

 

अमरावती,दि.२४: विभागीय क्रीडा संकुल येथे कुडो आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कुडो बेल्ट परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते चषक व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

हिमाचल प्रदेशाची राजधानी सिमला येथे दिनांक 1 ते 7 सप्टेंबर 2021 या कालावधीमध्ये भारत सरकारतर्फे राष्ट्रीय पातळीवरील कुडो क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये देशभरातील पंधराशे स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यात वयवर्षे ४ ते ५० या वयोगटातील स्पर्धकांचा समावेश होता. यात अमरावती येथील सहा विद्यार्थ्यांना प्राविण्य प्राप्त झाले. या विद्यार्थ्यांचा आज पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या विद्यार्थ्यांमध्ये खुशी पारडे आणि वेदांत खेडकर यांना सूवर्ण पदक, गौरी हरणे, श्रावस्ती धारकर, विश्वजीत बोरकर यांना रौप्य पदक तर दिव्या फुलवाणी यांना ब्राँझपदक प्राप्त झाले आहे. यावेळी विद्याथ्यांनी कुडो खेळाचा स्व:रक्षणासाठी कसा उपयोग करता येईल, याचे प्रशिक्षक अस्लम शहा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रात्यक्षिक करुन दाखविले. स्व:रक्षणासाठी कुडोचे प्रशिक्षण महत्त्वपूर्ण असल्याचे श्रीमती ठाकूर यावेळी म्हणाल्या . नगरसेवक विलास इंगोले, बबलु शेखावत, कुडो असोसिएशनचे अध्यक्ष अब्दुल परवेज तसेच विद्यार्थी, पालकवर्ग आदी यावेळी उपस्थित होते .

कुडो हा जपान येथील मिक्स मार्शल खेळ प्रकार आहे. भारतामध्ये या क्रीडा प्रकाराला दहा वर्षांपूर्वी अभिनेता अक्षय कुमार यांनी सुरवात केली. या खेळाला भारत शासनाची मान्यता मिळाली आहे , अशी माहिती अस्लम शहा यांनी दिली .