कायदा व सुव्यवस्थेच्या आढाव्यासाठी गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

जलद कार्यवाहीसाठी डायल 112 प्रकल्प
पोलीस दलाचे बळकटीकरण; आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तत्काळ सेवा
– गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

अमरावती : राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस दलाच्या बळकटीकरणासह अन्वेषण प्रक्रियेला गती मिळण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञान असे अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. राज्यातील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ सेवा उपलब्ध करून देण्यासाठी डायल 112 प्रकल्प लवकरच कार्यान्वित होईल, असे प्रतिपादन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज येथे केले.

अमरावती परिक्षेत्रातील, तसेच अमरावती शहर आयुक्तालयांतर्गत कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी स्वतंत्र बैठका गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या मंथन सभागृहात झाल्या, त्यावेळी ते बोलत होते. महिला व बालविकास मंत्री तथा अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यावेळी उपस्थित होत्या. परिक्षेत्रस्तरीय बैठकीत विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी, तर आयुक्तालय स्तरीय बैठकीत पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी सादरीकरण केले.

परिक्षेत्रीय बैठकीत अमरावती पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ, अकोला पोलीस अधिक्षक जी. श्रीधर, यवतमाळ पो. अधिक्षक दिलीप भुजबळ पाटील, बुलडाणा पो. अधिक्षक अरविंद चावरिया, वाशिम पोलीस अधिक्षक बच्चन सिंह, अतिरिक्त पोलीस अधिक्षक शशिकांत सातव यांच्यासह विविध पोलीस अधिकारी उपस्थित होते.

गृहमंत्री श्री. वळसे पाटील म्हणाले की, कोविडकाळात पोलिसांनी जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावले. पोलिसांना चांगला निवारा मिळावा यासाठी पोलीस गृहनिर्माण प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करावे. पोलीस अंमलदार सेवानिवृत्त होताना अधिकारी म्हणून निवृत्त व्हावा यासाठी सकारात्मक निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिपाईपदी रूजू झालेल्या व्यक्तीला त्याच्या पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नतीची तरतूद करण्यात आली. या निर्णयामुळे पोलीस विभागाची ताकद तसेच क्षमता वाढणार आहे. महिला पोलिसांच्या कामाचे तास कमी करण्याच्या निर्णयासह मनुष्यबळ वाढविण्यासाठी भरतीची प्रक्रियाही राबविण्यात येत आहे.

ते पुढे म्हणाले की, जनसामान्यांच्या मनात विश्वास निर्माण करण्याची आपली जबाबदारी आहे. पोलीस ठाण्यात आपली तक्रार, समस्या घेऊन येणा-या नागरिकांना सन्मानाची वागणूक द्यावी. आपल्या कामांचे वेळोवेळी मूल्यमापन करून उज्ज्वल कामगिरीसाठी सातत्याने प्रयत्न करा. अवैध धंद्यांना आळा घालावा. प्रतिबंधात्मक कारवायांचे प्रमाण वाढवा. गुन्हेगाराला कठोर शासन व्हावे, गुणवत्तापूर्ण तपास करून लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करावे. गुन्हेगारी प्रवृत्तीचा बिमोड करून कायद्याची जरब निर्माण करा, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. महिला अधिकारी व कर्मचा-यांचा समावेश असलेले एक स्वतंत्र महिला पोलीस ठाणे तयार करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

दलाच्या प्रशासकीय आवश्यकता, डिजीटल वायरलेस सिस्टम आदी विविध आवश्यक बाबींविषयी निश्चितपणे सकारात्मक कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

वाहतूक पोलीसांना सुविधा आवश्यक : पालकमंत्री ॲड. ठाकूर

वाहतूक पोलीस सार्वजनिक ठिकाणी दिवसभर कर्तव्य निभावत असतात. त्यांना स्वच्छतागृहे उपलब्ध नसल्यामुळे अडचण होते. विशेषत: महिला पोलीसांची जास्त गैरसोय होते. हा थेट आरोग्याशी निगडित प्रश्न आहे. त्यामुळे वाहतूक पोलीसांसाठी स्वच्छतागृहे असावीत. मोबाईल स्वच्छतागृहांची सुविधाही देता येणे शक्य आहे. तशी तरतूद व्हावी, अशी मागणी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी यावेळी केली. महिलांसाठी शहर पोलीसांतर्फे 24 तास मदत कक्ष सुरु करण्यात आला. त्याबाबत अधिकाधिक जनजागृती करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले.

अमरावती परिक्षेत्राबाबत सादरीकरण श्री. मीना यांनी केले. अमरावती परिक्षेत्रात २५ उपविभाग, १३१ पोलीस ठाणी आहेत. विभागात गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी २०२० मध्ये ६७ हजार १५९ प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या. २०२१ मध्ये सप्टेंबरपर्यंत ५३ हजार ९७४ प्रतिबंधात्मक कारवाया केल्या. त्यामुळे गुन्ह्यांचे प्रमाण कमी होण्यास मदत झाली. अमरावती जिल्ह्यात महिला व बालकांवरील अत्याचार रोखण्यासाठी जनजागृतीपर रक्षादीप उपक्रम व पोलीस हेल्थ ऍप, अकोला जिल्ह्यात एक गाव एक पोलीस योजना, आधुनिकीकरणासाठी तंत्रज्ञानाचा वापर, वाशिम जिल्ह्यात स्टुडंट पोलीस कॅडेट, अंमली पदार्थ मोहिम, बुलडाणा जिल्ह्यात एटीएम चोरी उत्कृष्ट तपास, यवतमाळ जिल्ह्यात एटीएम क्लोनिंग, एटीएम गॅस कटिंग याबाबत उत्कृष्ट तपास आदी वैशिष्ट्यपूर्ण कामे झाली. विभागांतर्गत कोविड साथीत 196 अधिकारी व 1548 अंमलदार बाधित झाले. या काळात 19 कार्यरत कर्मचाऱ्यांचे निधन झाले, असे श्री. मीना यांनी सांगितले.

आयुक्तालयांतर्गत कामकाजाबाबत सादरीकरण पोलीस आयुक्त डॉ. सिंह यांनी केले. आयुक्तालयांतर्गत १० पोलीस ठाणी आहेत. ‘एससीआरबी’च्या अहवालानुसार, डिसेंबर २०२० पर्यंतच्या आकडेवारीनुसार अमरावती आयुक्तालयांतर्गत गुन्हे सिद्धीचे प्रमाण ९०.४८ टक्के राहिले. दोषसिद्धीबाबत अमरावती आयुक्तालय राज्यात अग्रेसर आहे. सायबर गुन्हे व धोके यापासून दक्षता व जनजागृतीपर पुस्तिका प्रसिद्ध केली. व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टीम, पोलीस पेट्रोलिंग सिस्टीम, ई लायब्ररी निर्माण करण्यात आली. सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात विनयभंग गुन्ह्याचा तपास ७२ तासांत पूर्ण करून दोषारोपपत्र दाखल करण्यात आले, असे डॉ. सिंह यांनी सांगितले.

अमरावती पोलीस आयुक्तालयातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या सायबर गुन्ह्याविषयी जनजागृती अभियान, सन्मान या दोन पुस्तिकांचे प्रकाशन गृहमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. उत्कृष्ट कामगिरी करणा-या अधिकारी व कर्मचा-यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.