ता. ३० : शहरातील नागरिकांनी घरातील कचरा झेंडीत अथवा उघड्यावर टाकू नका. तसे आढळून आल्यास संबंधित नागरिकांवर कडक कारवाई केली जाणार आहे.
त्यामुळे नागरिकांनी मनपाच्या स्वच्छता विभागातर्फे फिरणाऱ्या घंटागाडीमध्येच कचरा टाकावा व शहर स्वच्छ राखण्यात प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.
चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत आयुक्त राजेश मोहिते व अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल यांच्या
अध्यक्षतेखाली गुरुवारी आरोग्य आणि स्वच्छता विभागाच्या संयुक्त बैठकीत आढावा घेण्यात आला. नागरिक घंटागाडीमध्ये कचरा न टाकता बाहेर रस्त्यावर किंवा इतरत्र टाकतात. ज्यामुळे दुर्गंधी निर्माण होते व रोगराई पसरण्याचा धोका देखील बळावतो.
सदर बाबीचे गांभीर्य लक्षात घेता मनपा आयुक्त व अतिरिक्त आयुक्त यांनी कचरा निर्मूलनावर लक्ष देण्याचे आदेश दिले. कचरा निष्पादनाच्या कामाचे पर्यवेक्षण करण्यासाठी महापालिकेद्वारे शहरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून,
स्वच्छता दूत देखील नेमण्यात आलेले आहेत. त्यामुळे नागरिकांनी कचरा घंटागाडीतच टाकावा व दंडात्मक कारवाई टाळावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाद्वारे करण्यात आलेले आहे.