गणोजा देवी येथील तीनशे पुरग्रस्तांचे जलसमाधी आंदोलन दोन तास वाहतूक बंद: जिल्हा प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे

 

विदर्भ ब्युरो चीफ// धनराज खर्चान

भातकुली -: तालुक्यातील गणोजा देवी येथील सुमारे तीनशे पुरग्रस्तांच्या पुर्नवसन सह विविध मागण्यांसाठी आज दि .२९ सप्टेंबर ला भातकुली पेढी नदीच्या पात्रात जलसमाधी आंदोलन करण्यात आले होते, मात्र पोलीस प्रशासनाने मोर्चा अडविल्याने मोर्चेकऱ्यांनी रस्त्यावर बसून आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांनी लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन संपणार नाही अशी भूमिका घेतल्याने अखेर तालुका प्रशासनाने पुरग्रस्तांच्या समस्या सोडविण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
गणोजा देवी येथे पेढी नदीच्या पलीकडील काठावर सुमारे पन्नास वर्षांपासून तीनशे लोकांची वस्ती आहे. या वस्तीतील लोकांना पावसाळ्यात नदीला पूर आल्यास दळणवळनाचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. येथील लोकांसाठी पेढी नदीवर पूल बांधून रस्ता करण्याच्या मागणीसह विविध मागणीसाठी युवा लॉयन्सचे ग्रुप चे अध्यक्ष संस्थापक योगेश गुडधे यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी अकरा वाजता जलसमाधी आंदोलन करण्यात आले. यावेळी तीनशे पुरग्रस्तसांसह शेकडो नागरिक उपस्थित होते.
भातकुली बसस्थानक चौकातून निघालेला हा मोर्चा पोलिसांनी पेढी नदीच्या पुलाच्या अलीकडेच अडवला. त्यामुळे आंदोलन कर्त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. यावेळी काहीसा तणाव निर्माण झाला होता. हा रस्ता वाहतुकीचा असल्याने दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. सुमारे दोन तास वाहतूक ठप्प झाली होती.
अखेर प्रशासनाच्यावतीने उपविभागीय अधिकारी विजय व्यवहारे, तहसीलदार नीता लबडे, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. गायकवाड यांनी आंदोलन कर्त्यांशी चर्चा करून पुरग्रस्तांच्या समस्या सोडविण्यासंदर्भात शासनाला प्रस्ताव सादर करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले. त्यांनतर आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी महसूल विभागाचे व पोलिस प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.

कडक पोलिस बंदोबस्त होता
पुरग्रस्तांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर येथील ठाणेदार श्री. टाले यांच्या मार्गदर्शनाखाली तगडा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. आंदोलन शांततेत पार पडले.
गणोजा देवी येथील सुमारे तीनशे पुरग्रस्त जलसमाधी आंदोलनात सहभागी होणार असल्याने आज सकाळीच अमरावती येथून रेस्क्यू ऑपरेशन टीम सर्व साहित्यानिशी येथील पेढी नदीच्या काठावर सज्ज झाली होती. परंतु पोलिस प्रशासनाने आंदोलकांचा मोर्चा अडविल्याने शांततेत आंदोलन पार पडले.

सुमारे दोन तास वाहतूक ठप्प
पुरग्रस्तांचे जलसमाधी आंदोलन मुळे पोलिस प्रशासनाने भातकुली ते अमरावती राज्य मार्गावर पेढी नदीच्या पुलाजवळ दोन्ही बाजूला बॅरिकेट्स लावल्याने सुमारे दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. त्यामुळे अनेकांना त्रास सहन करावा लागला