विदर्भ राज्य आंदोलन समिती कडून इर्विन चौकात केली नागपूर कराराची होळी

 

विदर्भ ब्युरो चीफ // धनराज खर्चान

अमरावती -: नागपूर कराराचे पालन झाले नसल्याचा निषेध म्हणून विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने आज दि.२८ सप्टेंबर ला शहरातील इर्विन चौकात होळी करण्यात आली.

 

महाराष्ट्राच्या स्थापनेपासून विदर्भावर सातत्याने अन्याय होत असल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी हातात झेंडे व फलक घेऊन घोषणा देत सर्वसामान्यांचे लक्ष वेधून घेतले.

 

‘जळाला रे जळाला नागपूर करार जळाला’, महाराष्ट्र सरकारचा निषेध असो, ‘ले के रहेंगे ले के रहेंगे, विदर्भ राज लेकर रहेंगे’, ‘नाही कुणाच्या बापाचा, विदर्भ आमच्या हक्काचा’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमला होता

 

तत्कालीन राज्यकर्ते आणि विदर्भातील काही मान्यवरांनी महाराष्ट्राची स्थापना होण्यापूर्वी २८ सप्टेंबर १९५३ रोजी ‘नागपूर करार’ केला.

 

नागपुरात विधिमंडळाचे अधिवेशन वगळता करारातील अकरा कलमांपैकी अन्य कलमांचे पालन झालेले नाही. सरकारी नोकरीसह निधी देण्यास आतापर्यंतचे सर्व राज्यकर्ते उदासीन आहे.

 

नागपूर कराराने विदर्भाला गुलाम केले. स्वातंत्र्य हिरावून घेतले.विदर्भ महाराष्ट्रात विलीन झाल्यानंतर सातत्याने अन्याय करण्यात आला. पश्चिम महाराष्ट्राने निधी लाटून विदर्भाची गोची केली.

 

परिणामी, विदर्भातील शेतकरी आत्महत्येस प्रवृत्त होत आहे. आता हा अन्याय आणखी सहन केला जाणार नाही,

 

अशी भूमिका विदर्भ राज्य आघाडीने घेतली आहे. वेगळे विदर्भ राज्य देण्याच्या मागणीसाठी आज या कराराची पुन्हा होळी करण्यात आली.

 

आज झालेल्या आंदोलन दरम्यान रंजना मामर्डे ,राजेंद्र आगरकर ,सतीश प्रेमलवार ,डॉ.विजय कुबडे,पांडुरंग बिजवे,प्रकाश लढ्ढा, सरला सपकाळ सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते