, ता. ५ : जन्मानंतर जगण्याची शिकवण पहिले गुरु आई-वडील देत असतात. या जीवनात चांगलं जगण्याची दिशा शिक्षक देतात. आज शिक्षणाची माध्यमे बदलत आहेत. त्यामुळे शिक्षणाला तंत्रज्ञानाची जोड आवश्यक असल्याचे प्रतिपादन मनपाचे उपमहापौर राहुल पावडे यांनी केले.
चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीदिनी शिक्षक दिनानिमित्त शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित आदर्श शिक्षक, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्यात बोलत होते.
यावेळी मंचावर स्थायी समिती सभापती रवी आसवानी, अतिरिक्त आयुक्त विपीन पालिवाल, डायटचे प्राचार्य धनंजय चाफले, झोन एकच्या सभापती छबूताई वैरागडे, झोन दोनच्या सभापती खुशबू चौधरी, नगरसेवक स्नेहल रामटेके, नगरसेविका वंदना तिखे, नगरसेविका आशाताई आबोजवार, नगरसेविका सविता कांबळे, नगरसेविका अनुराधा हजारे आदींची उपस्थिती होती.
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिक्षक दिनानिमित्त सेवानिवृत्त शिक्षक, आदर्श शिक्षण, उपक्रमशील शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. शालांत परीक्षा उत्कृष्ट कामगिरी करणारे शिक्षक शिवलाल इरपाते, एनएमएमएस परीक्षेत उत्कृष्ट निकाल देणारे शिक्षक भास्कर गेडाम यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
स्थायी समिती सभापती रवी आसवानी यांनी यावेळी गुरुविना ज्ञान नाही असे सांगून गुरूच्या मार्गदर्शणामुळेच आपण आज इथंपर्यंत पोहोचल्याचे भावोदगार व्यक्त केले. अतिरिक्त आयुक्त विपीन पालिवाल यांनीही यावेळी शिक्षकांना मार्गदर्शन केले.
ते म्हणाले, माणूस म्हणून जगायला शिकविणारी फॅक्टरी म्हणजे शाळा होय. स्मार्ट शहरे निर्माण करता येतील. पण, तिथे वास्तव करण्यासाठी स्मार्ट माणसं निर्माण करण्याची ताकद शिक्षणातून व्हावी. दुसऱ्याच्या जिवनात प्रकाश देण्याचे काम शिक्षकांनी करावे, बदलत्या तंत्रज्ञानानुसार शिक्षकांनी अपग्रेड होऊन विद्यार्थांमधील गुणवत्ता शोधावी असे आवाहन केले.
सोहळ्यात डायटचे प्राचार्य धनंजय चाफले म्हणाले, शिक्षण ही कुणाची मालमत्ता नाही. ती श्रीमंतांच्या महालात आणि झोपडीत देखील असते. ती फक्त शोधता आली पाहिजे. यावेळी त्यांनी आदर्श शिक्षण कसा घडावा, याचे उदाहरण सांगितले. प्रास्ताविक प्रशासन अधिकारी नागेश नीत यांनी, कार्यक्रमाचे संचालन स्वाती बेतावार यांनी तर आभार सुनील आत्राम यांनी मानले.
सेवानिवृत्त सत्कारमूर्ती
अनिता दहीवाडे, नसीम अख्तर, उषा पांडुरंग चन्ने, सुरेश बावणे, निलीमा नंदकिशोर हिंगे, मोहम्मद फजले म. वहीद खान, दिपा प्रदिप पाटील, मिनाक्षी रमेश ठोंबरे, सुरेखा रमेश निबाळकर यांचा समावेश आहे.
गुणवंत आदर्श शिक्षक
परिणय बंडूजी वासेकर (शहीद भगतसिंग प्रा.शाळा, भिवापूर वॉर्ड) व संजना संजय पिंपळशेंडे (लोकमान्य टिळक प्राथमिक शाळा, समाधी वॉर्ड)
गुणवंत विद्यार्थी
एकता गिरीश धामनकर, धनश्री सचिन बांगडे, अनुष्का योगेश रागीट, सुधीर केशव गांगले, वैष्णवी विजय सिडाम, वैष्णवी शेखर निधेकर, कल्याणी प्रभाकर इर्ला, अभिनयाकुमार आयनूरी, त्रीशा राकेश दुर्योधन, हिमांशु अशोक ठाकरे.