खासदार नवनीत राणा यांनी घेतल अधिकाऱ्यांची क्लास प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे दिले निर्देश

 

प्रतिनिधी -: धनराज खर्चान

अमरावती -: खासदार नवनीत रवी राणा यांनी आज सार्वजनिक बांधकाम विभाग, कामगार आयुक्तालयाचे अधिकारी, टाउन प्लॅनिंग अधिकारी, अग्निशमन विभाग व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा क्लास घेत प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांना दिले.

शहराचा विकास आराखडा बदलविणाऱ्या अधिकारी व समिती सदस्यांची मंत्री व राज्याच्या मुख्य सचिवांकडे तक्रार करणार असल्याचा इशारासुद्धा त्यांनी दिला. शहरात लागोपाठ दोन दिवस झालेल्या अग्निकांडामुळे शहर हादरले, नवनीत रवी राणा यांनी त्याबाबत चिंता व्यक्त केली. नागरिकांच्या जीविताशी खेळणाऱ्या व फायर ऑडिट न करणाऱ्या आस्थापनांची तत्काळ चौकशी करून अग्निशमन यंत्रणा सक्षमपणे कार्यान्वित आहेत की नाही याची तपासणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

गेल्या १५ वर्षांपासून रखडत-अत्यंत धिम्या गतीने सुरू असलेली भुयारी गटार योजना नेमकी कधी पूर्ण होणार व शहरातील सांडपाण्याचा योग्य निचरा होऊन शहर कधी स्वच्छ व रोगराईमुक्त होणार?

असा संतप्त सवाल यावेळी खासदार नवनीत राणा यांनी मजीप्राच्या अधिकाऱ्यांना केला. एखादा प्रोजेक्ट किती लांबवावा व त्याचे अंदाजपत्रक किती वाढवावे याला मर्यादा असाव्या व नागरिकांच्या सोयी सुविधांना वेळेचे बंधन पाळून प्राधान्य द्यावे, असे निर्देश त्यांनी दिले.

शहर विकास आराखड्यात फेरबदल करून शहराचा श्वास असणारी मोकळी मैदाने, शाळेची आरक्षित सांस्कृतिक, सामाजिक भवन, कचरा डेपो आदींसाठी आरक्षित असणाऱ्या जागा विशिष्ट लोकांच्या खिशात घालण्याचे कटकारस्थान काही समिती सदस्य व अधिकाऱ्यांनी केले. डीपी प्लॅनमध्ये हेराफेरी करणाऱ्या व ठराविक लोकांचा फायदा करणाऱ्या नगररचना अधिकाऱ्यांची खासदार नवनीत राणा यांनी चांगलीच खरडपट्टी काढून शहर आपल्या मालकीचे समजून मनमानी करू नका,

अन्यथा गय करणार नाही असा सज्जड दम दिला. पावसामुळे रस्ते खराब झाले असून या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत, त्यामुळे सर्व रस्त्यांची दुरवस्था दूर करावी व विकासकामांचे गुणवत्तापूर्ण नियोजन करून कामाचा दर्जा उत्तम ठेवावा,

असे निर्देश त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.