शहरातील दोन्ही स्मशानभूमीचे सौंदर्यीकरण करा नागरी समितीची नगराध्यक्षांकडे मागणी

कारंजा तालुका प्रतिनिधी //धिरज कसारे

कारंजा( घा) स्थानिक कारंजा शहरात दोन्ही स्मशानभूमीचे सौंदर्यीकरण करून शोकसभा मंडप उभारावा अशी मागणी निवेदनाद्वारे कारंजा नागरी समस्या संघर्ष समितीने नगराध्यक्षांकडे केली आहे.

स्मशान भूमी हे नागरिकाला अखेरचा निरोप देण्याचे स्थळ. मृतात्म्याप्रति शोक सुमने अर्पण करण्याची जागा त्यामुळे स्मशानभूमी परिसर स्वच्छ सुंदर व प्रशस्त असणे गरजेचे आहे. कारंजा शहरात दोन स्मशानभूमी आहे. अर्ध्या गावातील मृतात्म्यांचा अंत्यविधी हा खर्डी पुऱ्याच्या पलीकडे तलावाच्या शेजारी असलेल्या स्मशानभूमीत होतो. परंतु तेथील स्मशानभूमीची अवस्था दयनीय आहे. त्यामुळे त्या स्मशानभूमीचा विकास करणे अतिशय महत्त्वाचे आहे. तसेच महामार्गालगत व विठ्ठल टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या दुसऱ्या स्मशानभूमीमध्ये सुध्दा अंत्यविधीला उपस्थित असणाऱ्या शोकाकुल नागरिकांना उभे राहण्याकरिता आणि शोकसभा घेण्याकरता ऊन आणि पावसाच्या दृष्टीने शेडची नितांत गरज आहे. त्यामुळे नागरिकांची गरज लक्षात घेता शहरातील दोन्हीही स्मशानभूमीचा विकास करण्यात यावा. अशी मागणी निवेदनाद्वारे नागरी समितीने नगराध्यक्षांकडे केली आहे.

तसेच इतर मागण्या व समस्यांकडे सुद्धा नागरी समितीने लक्ष वेधले आहे. शहरातील मार्केटमध्ये पंचायत समिती पुढील चौकाच्या बाजूला सार्वजनिक शौचालय आहे. त्या शौचालयाचा वापर जवळपास अर्ध्या मार्केट मधील दुकानदार, ग्राहक, व नागरिक आणि लगतच असलेल्या सार्वजनिक वाचनालयातील विद्यार्थी सुद्धा करतात. परंतु ते शौचालय नियमित स्वच्छ केल्या जात नसल्याकारणाने बेजबाबदार नागरिक बाहेरच घाण करतात. त्यामुळे शौचालयाचा परिसर घाणेरडा झालेला आहे. रात्रीला तिथे लाईटची सुद्धा व्यवस्था नाही. त्यामुळे सदर शौचालय नगरपंचायत द्वारा नियमित स्वच्छ ठेवावे. अशी मागणी केली आहे.

प्रस्तावित पाणीपुरवठा योजना ताबडतोब मंजूर करून आणावी, अपघाताला आळा घालण्याकरता मुख्य मार्केट मधील रोडवर दोन्ही बाजूने सुधारित गतिरोधक तयार करावे.

वरील सर्व मागण्या ह्या शहर विकासाच्या दृष्टीने व नागरिकांच्या हिताच्या आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या, आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहे. त्यामुळे सदर मागण्यांवर लवकरात लवकर निर्णय घेऊन कार्यवाही करावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.निवेदन देते वेळी कारंजा नागरी समस्या संघर्ष समितीचे महिला व पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते.