सर्वांच्या सहकार्यामुळेच चांगले काम करता आले – प्रेरणा देशभ्रतार जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांचा निरोप नवीन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे स्वागत

वर्धा, दि.23 : जिल्ह्यातील सर्व विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी समन्वयाची भूमिका बजावून कामे केल्यामुळे कोविड 19 व गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीची विदारक स्थिती हाताळण्यास मदत मिळाली. कार्यकाळात इतरही चांगले काम करता आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी केले.
मावळत्या जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांना निरोप व नवीन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे स्वागत असा दुहेरी कार्यक्रम सामाजिक न्याय भवन येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी सत्काराला उत्तर देतांना श्रीमती देशभ्रतार बोलत होत्या.
यावेळी मावळत्या व नवीन जिल्हाधिकाऱ्यांसह उप वनसंरक्षक राकेश सेपट, अपर जिल्हाधिकारी मनोजकुमार खैरनार, निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, प्रेरणा देशभ्रतार यांच्या परिवारातील सदस्य तसेच सर्व उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, विभाग प्रमुख अधिकारी, तहसिलदार, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हयातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम केले. वेळ आणि कामाचे गांभिर्य ओळखून आपआपल्या जबाबदाऱ्या उत्तमपणे पार पाडल्या. त्यामुळे जिल्ह्यात चांगले काम करता आले. ऑनलाईन सातबारा, ई-पिक पाहणी, सेवादूत प्रकल्प, डिजिटल गाव नकाशे याबाबतीत उत्तम काम जिल्ह्याने गेल्या काळात केले.
मागील महिन्यात जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतपिकाचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले. या नुकसानीचे कृषि विभाग व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कमी वेळेत पंचनामे केले. कमी कालावधीत घरांच्या झालेल्या नुकसानीचे सानुग्रह मदतीचे सुध्दा वाटप आपण करु शकलो, असे प्रेरणा देशभ्रतार म्हणाल्या.
नवीन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी देखील यावेळी मनोगत व्यक्त केले. महात्मा गांधी यांच्या वास्तव्याने पावन झालेला हा जिल्हा आहे. महात्मा गांधींनी पहिल्या वैयक्तिक सत्याग्रहाला सेवाग्राम येथून सुरुवात केली. अशा या वर्धा जिल्ह्यात काम करण्याची संधी मिळाली. या संधीचे सोने करुन जिल्ह्यातील सामान्य नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. तसेच मागील प्रलंबित असलेली कामे करण्याबरोबरच पुढील कामाचे मापदंड गाठण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितले.
यावेळी उपविभागीय अधिकारी हरीष धार्मिक, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त प्रसाद कुळकर्णी यांच्यासह तलाठी व कोतवाल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी सत्कामुर्ती प्रेरणा देशभ्रतार व जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा महसूल विभागाच्यावतीने मनोजकुमार खैरनार, अर्चना मोरे यांनी चरखा व शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. तसेच इतर शासकीय अधिकारी, तलाठी संघटना, कोतवाल संघटना, सामाजिक संस्थाच्या प्रतिनिधींनी सुध्दा प्रेरणा देशभ्रतार यांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्चना मोरे यांनी केले. संचलन अतुल रासपायले यांनी केले तर आभार तहसिलदार विजय लोखंडे यांनी मानले.