आर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲड. दिलीपराव उपाख्य भैय्यासाहेब काळे यांचे निधन

 

आर्वी कृषी उत्पन्न बाजार समिती चे माजी सभापती तसेच मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मा.ॲड. दिलीपराव उपाख्य भैय्यासाहेब काळे यांचे दिनांक 21 ऑगस्ट 2022 ला दुपारी 11:45 ला वृद्धापकाळाने निधन झाले.
ते मृत्यू समयी 74 वर्षाचे होते. वर्धा जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते म्हणून त्यांची ओळख होती. 1982 पासून मध्ये पाच वर्षाचा कालखंड सोडला तर ते आजतागायत सलग आर्वी कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती राहिले आहे. 1994 ते 2004 दरम्यान आर्वी तालुका जिनिंग प्रेसिंग संस्था व खरेदी-विक्री संघाचे देखील ते सभापती होते. सोबतच 1991 ते 2002 दरम्यान वर्धा जिल्हा को-ऑपरेटिव्ह बँकेचे उपाध्यक्ष सुद्धा राहिले. 1997 ला विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग सोसायटीचे संचालक म्हणून व 2007 पासून प्रभारी अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी विदर्भ को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे कार्य केले आहे. महाराष्ट्रातील मानांकित मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे एका कार्यकाळासाठी सभापती व तीन कार्यकाळासाठी उपसभापती म्हणून सुद्धा त्यांनी कार्य केले आहे. कृषी पणन महामंडळ, पुणे येथे नागपूर विभागातर्फे संचालक म्हणून त्यांची दोनदा त्यांची निवड झाली आहे. तसेच कृषी पणन महामंडळाची राष्ट्रीय स्तरावरील शीर्षस्थ संस्था ‘कोसाम्ब’ दिल्ली येथे देखील त्यांनी महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच आर्वी,आष्टी व कारंजा तालुक्यात शिक्षणाची चळवळ उभ्या करणाऱ्या भारत शिक्षण संस्था व कृषी शिक्षण संस्था दोन्ही संस्थांचे ते विद्यमान अध्यक्ष होते. ॲड.भैय्यासाहेब काळे यांची साहित्य व कला या क्षेत्रात देखील विशेष रुची व आवड होती. त्यादरम्यानच त्यांनी दैनिक विदर्भ रंग व साप्ताहिक अभिजीत यांचे संपादक म्हणून सुद्धा कार्य केले आहे.
आर्वी तालुक्याच्या सामाजिक,राजकीय, शैक्षणिक जडणघडणीमध्ये मा.ॲड.दिलीपराव उपाख्य भैय्यासाहेब काळे यांचा मोठा वाटा आहे. सोबतच राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांनी बरेच पदे भूषविली आहे. व आपल्या कार्याची अमिट शाप सोडली आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण आर्वी तालुक्यात शोककळा पसरली आहे.