वर्धा जिल्हा प्रतिनिधी // उमंग शुक्ला
वर्धा:आराध्या (परी) नितीन मेश्राम, रा. सिंधी (मेघे) वर्धा या 8 वर्षीय चिमुकलीला 2 महिण्याआधी अतिशय दुर्धर स्वरूपाचा ब्लड कॅन्सर असल्याचे निदान झाले. मागील महिनाभरापासून तिच्यावर नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट जामठा नागपूर या रुग्णालयातील लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या उपचारासाठी अंदाजे 4 लाख रु. इतका खर्च अपेक्षित आहे.
या चिमुकलीला वडील नाहीत तिची आई शिलाईचे काम करून कसाबसा दोघींचा संसार चालवायची. आधीच इतक्या प्रतिकूल आर्थिक परिस्थितीशी झुंज देणाऱ्या त्या माऊलीच्या जगण्याचा एकमेव आधार असलेल्या या चिमुकलीला ब्लड कॅन्सर झाल्याने तिच्या पायाखालची जमीनच सरकली व एवढा महागडा उपचार कुठून करायचा हा मोठा प्रश्न तिच्या पुढे उभा राहिला. जवळचे होते नव्हते सर्व पैसे व नातेवाईकांकडून मिळालेली मदत सर्व मुलीच्या उपचारासाठी लावली. अश्यातच रोहित रक्तदान फाउंडेशन च्या जबाबदार सभासदांनी परीच्या उपचाराकरिता आर्थिक मदतीसाठीच्या आवाहनाची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केली. ती राहत असलेल्या आजूबाजुच्या लोकांनी लोकवर्गणीतून व इतरही काही दानशूर लोकांनी व तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी देखील तिच्यासाठी आर्थिक मदत गोळा करून त्यातून सद्यस्थितीत तिचा उपचार सुरू आहे.
वंचितांच्या आरोग्यासाठी काम करणाऱ्या वर्धेतील जिव्हाळा सेवाभावी संस्थेनी संबंधित मुलीची संपूर्ण माहिती घेवून लगेचच त्याविषयीची माहिती जिव्हाळाच्या व्हाट्सएप ग्रुपवर देण्यात आली व तिला संस्थेतर्फे मदत करण्याचे ठरविण्यात आले. जिव्हाळाच्या एका आवाहणावर परिसाठी मदतनिधी उभा करवून देतांना जिव्हाळाच्या अनेक सभासदांनी दोनच दिवसांत स्वयंस्फुर्तीने भरगोस आर्थिक मदत संस्थेत जमा केली. त्यानंतर जिव्हाळा परिवाराच्या सभासदांनी जामठ्यातील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट गाठून परीच्या आईसोबत सविस्तर चर्चा करून तिच्या आरोग्याविषयीची व आर्थिक परिस्थितीची संपूर्ण माहिती घेतली. जमा झालेल्या रकमेतून जिव्हाळा सेवाभावी संस्थेच्या वतीने 51,000/- रुपयांचे धनादेश परीच्या आईकडे सुपूर्द करण्यात आले व तिच्या आईला शक्य होईल ती सर्व मदत यापुढेही करण्याचे आश्वासन जिव्हाळा परिवाराच्या सभासदांनी दिले. सद्यस्थितीत तिची प्रकृती काहीशी नाजूकच आहे व तिला बरेच दिवस उपचारांची गरज असल्यामुळे तिला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आल्याचे तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी जिव्हाळा परिवाराला सांगितले.
परीला मदत करण्यासाठी जिव्हाळा परिवाराच्या देनगीदात्यांचे रक्तदात्यांचे व सभासदांचे मोलाचे सहकार्य लाभले व त्यामुळेच एका अत्यंत गरजू चिमुकलीला ही मदत करता आल्याची भावना संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आली.
परीच्या उपचारासाठी समाजातील इतरही होतकरू दानशूर लोकांनी देखील या कठीण प्रसंगी पुढे येवून तिला मदत करावी असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले. तिला मदत करण्यासाठी तिची आई उज्ज्वला नितीन मेश्राम यांचा कॅनरा बँक खाते क्रं. 55102210088302, IFSC Code: CNRB0002632 येथे मदत करावी