अतिवृष्टीमुळे जखमी झालेल्या वन्यप्राण्यांना ‘करूणाश्रम’चा आधार

अतिवृष्टीचा फटका आता मानवप्राण्यांसोबतच वन्य प्राण्यांनाही बसू लागला आहे.

अतिवृष्टीमुळे जखमी झालेल्या वन्यप्राण्यांना ‘करूणाश्रम’चा आधार

वर्धा : अतिवृष्टीचा फटका आता मानवप्राण्यांसोबतच वन्य प्राण्यांनाही बसू लागला आहे. मुसळधारने गर्भगळीत झालेल्या या मुक्या जीवांना वनखाते ‘करूणाश्रम’च्या हवाली करीत आहे. सतत दहा दिवसापासून जिल्ह्यात रात्रंदिवस पाऊस बरसत आहे . त्यामुळे बोर अभयारण्यातील प्राणी सैरभैर झाले आहेत. आसरा नसल्याने माकडं शहराकडे धाव घेत सुटली असून काही पावसाच्या माऱ्याने झाडावरून जमिनीवर आपटली. जखमींना वर्धेतील पशू अनाथालय असलेल्या ‘करूणाश्रम’कडे सोपवित आहे.

आजपर्यंत बारा माकडं तसेच चार रोही पावसाने जखमी झाल्याने या ठिकाणी उपचार घेत आहे. जंगलातील ज्या दुर्गम भागात वन कर्मचारी पोहोचू शकत नाही तिथेही काही मोठे प्राणी जखमी अवस्थेत पडून असू शकतात, अशी शंका ‘करुणाश्रम’चे आशिष गोस्वामी व्यक्त करतात.

मोकाट जनावरे पावसाच्या माराने असह्य होऊन पडून राहतात. त्यांचे मृतदेह निर्जन स्थळी आणून टाकल्या जात असल्याचे पाहायला मिळते. असा पाऊस प्राण्यांची अवस्था बिकट करीत आहे, अशी खंत गोस्वामी व्यक्त करतात. मात्र, असे जखमी प्राणी आमच्याकडे आणून दिल्यास आम्ही त्यांना सांभाळू, असे ते म्हणाले.

पशुसंवर्धन अधिकारी डॉ. बी. व्ही. वंजारी यांनी सांगितले, की पावसाने पशूंची स्थिती गंभीर झाली आहे. गावात गोठ्यात पाणी साचले असल्याने जनावरे उभीच राहतात. त्यामुळे ते विकलांगही होऊ शकतात. चाऱ्याचाही प्रश्न आहेच.