आष्टी तालुक्यात मुसळधार पावसाचा कहर

 

 

आष्टी (शहीद):-काल मध्यरात्री सुरू झालेला मुसळधार पाऊस आज दुपारी साडेतीन वाजेपर्यंत सतत सुरू होता पाण्याचा प्रचंड वेग असल्याने मोठ्या प्रमाणात नदी नाल्यांना पूर आला नदी व नाल्याच्या काठावरील शेतामध्ये पुराचे पाणी साचले अनेक गावातील घरांचे नुकसान झाले.

 

आष्टी व पेठअहमदपूर या दोन गावांना प्रचंड लेंडी नदीच्या पुराचा फटका बसला. तलावाचे ओव्हर फ्लो पाणी लेंडी नदीमध्ये आल्यामुळे लेंडी नदीचा प्रभाव भरमसाठ वाढला. ही नदी आष्टी आणि पेठअमदपुर या दोन्ही शहराच्या मधामधून जाते. या नदीला पूर आल्यामुळे सुमारे 600 मीटर अंतरामधील 170 घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची प्रचंड तारांबळ उडाली. नगरपंचायत प्रशासनाने 59 कुटुंबाचे स्थलांतर हुतात्मा स्मारक समितीचे वस्तीगृह व ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीमध्ये केले. या सर्व घरामधील जीवनावश्यक वस्तू, वापरावयाच्या वस्तू पावसामुळे पूर्णता खराब झाल्या. अनेक घरे मातीचे असल्यामुळे भिंती पडल्या आहे. तहसीलदार सचिन कुमावत, नगराध्यक्ष अनिल धोत्रे यांनी या परिसराचा दौरा करून बाधित कुटुंबाला तातडीने मदत देण्याचे निर्देश दिले आहे.

 

तालुक्यात एकूण 3700 हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले असून एकूण 23 गावांमधील 285 घरांची अंशतः पडझड झाली आहे तर 12  घरं पूर्णता पडली आहे. चार गाई, सहा बकऱ्या मृत्यू पावले आहे.

 

आष्टी मोर्शी राज्य मार्गावर गुल्हाने यांच्या शेताजवळील नाल्याला भला मोठा पूर आल्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. लहान आर्वी येथे वाघाडी नाल्याला पूर आल्याने लहानआर्वी गावाला पुराच्या पाण्याने वेडा घातला. तीस घरांची पडझड झाली. शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले.

 

सुजातपूर भारसवाडा मार्गावर पुलावरून पाणी असल्यामुळे या ठिकाणची वाहतूक पूर्णतः बंद होती. स्मशानभूमी परिसरामध्ये नाल्याच्या पाण्याचा प्रभाव जास्त असल्याने सुमारे दीडशे हेक्टर वरील पिकं खराब झाली.

 

 

आष्टी परसोडा मार्गावर भगवतीच्या नाल्याला पूर आल्यामुळे मोठ्या प्रमाणात दोन्ही बाजूला शेतामध्ये पाणी साचले होते या मार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद झाली होती.

 

आष्टी वरुड राष्ट्रीय महामार्गावर निखरा यांच्या शेताजवळील नाल्याला मोठा पूर आला होता. तर धाडी गावाजवळ जाम नदीला पूर आल्यामुळे या ठिकाणची सुद्धा वाहतूक खोळंबली होती. या परिसरातील शेती पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले.

 

साहुर येथील मंजुळा नदीला व तारासावंगा येथील कड नदीला पूर आल्यामुळे या परिसरातील सुमारे 1200 हेक्टर वरील शेती पिकांना प्रचंड फटका बसला आहे.

 

 

आष्टी येथे बाकळी नदीला पूर आल्यामुळे स्मशानभूमी, दशक्रिया घाटाचे काही अंशी नुकसान झाले. पाण्याचा प्रवाह प्रचंड असल्यामुळे पूर पाहण्यासाठी नागरिकांनी चांगलीच गर्दी केली होती. या नदीकाठावरील दोन्ही बाजूच्या शेतामध्ये पाणी शिरल्यामुळे पिकांना चांगलाच फटका बसला आहे.

 

 

तळेगाव, बेलोरा, चिस्तुर, आनंदवाडी या भागामध्ये नाल्याच्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले. आनंदवाडी गावाला पुराच्या पाण्याने विळखा घातला होता.

 

 

तालुक्यात गेल्या तासाभऱ्यापूर्वी पाऊस थांबल्याने पुराचे पाणी कमी होत आहे मात्र जनजीवन पूर्णता विस्कळीत झालेले आहे.