पुरात अडकलेल्या वर्ध्याच्या १३ युवकांना तहसीलदारांच्या पथकाने काढले बाहेर अंधारात ही रेस्क्यू कामगिरी करणाऱ्या महिला तहसीलदार ऐश्वर्या गिरी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे

 

 

कारंजा तालुका प्रतिनिधी //धीरज कसारे

कारंजा (घा.) तालुक्यातील ढगा येथील महादेव मंदिरात वर्धा येथील इतवारा परिसरातील १३ युवक सोमवारी पहाटे दर्शकरिता आले होते. अतिपावसामुळे नजीकच्या धाम नदीला पूर आल्याने ते सर्व युवक नदीच्या पलिकडे अडकले होते. अखेर माहिती मिळताच कारंजाच्या तहसीलदार ऐश्वर्या गिरी यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या साहाय्याने घटनास्थळ गाठून सर्वांना सुखरुप बाहेर काढले.

हा जंगलव्याप्त परिसर असून या भागात मोबाईलची रेंजही राहत नसल्याने पुरात अडकलेल्या युवकांना इतरांशी संपर्क साधण्यास अडचणीचे झाले होते. अखेर दुपारी दोन वाजता संपर्क झाला आणि बचावाकरिता यंत्रणा कामाला लागली. या रेस्क्यू कामाच्या ऑपरेशनमध्ये महत्त्वाची भूमिका निभावणारे येथील वनमजूर पद्माकर पांडुरंग मरस कोल्हे व रामेश्वर भीमजी पट्टे यांच्या साहाय्याने अडकलेल्या १३ ही युवाकंना पाण्याचा प्रवाह कमी असलेल्या ठिकाणाहून बाहेर काढले. रात्री साडेआठ पर्यंत ही मोहीम चालली असून तसीलदार ऐश्वर्या गिरी, नायब तहसीलदार किशोर साळवे, पंचायत समिती कारंजा माजी उपसभापती जगदीश डोळे, ललिता साबळे, मंडळ अधिकारी नरुले, कोतवाल सुशील डोंगरे, अंबुडारे व पोलीस कर्मचारी उपस्थित होते. तसेच मासोद व ढगा येथील गावकरी उपस्थित होते.

या पुरामध्ये अडकलेल्या वर्धा येथील इतवारा परिसरातील जर्दीन शेख जलील शेख, शेख अभिस शेख अख्तर, उमेश सूरज पांडे, अभिषेक अजय खत्री, राजेश कैलास पेंदोरे, लखन बाबूलाल सोळुंखे, रोशन अशोक वाशीकर, गणेश अनिल श्रीवास्तव, गणेश शंकरप्रसाद पांडे, विनोद बाबूलाल सोळंकी, मिथुन भागवतराव उईके, आयुष पुरुषोत्तम वावरे, आकाश रतन उगले यांनी मदत करणाऱ्या सर्वांचे आभार मानले. गडद अंधारात ही कामगिरी करणाऱ्या महिला तहसीलदार ऐश्वर्या गिरी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.