आष्टी रिठ येथील शेतकऱ्यांना शेतीत जाण्याचा रस्ता मोकळा करून देण्याची गावातील शेतकऱ्यांनी वंचितचे नेते राजु झोडे यांच्या नेतृत्वात प्रशासनाकडे मागणी

 

चंद्रपुर ( राजू वानखेडे: उपसंपादक)

बल्लारपूर तालुक्यातील कळमना (आष्टी रिट) येथील ४० ते ५० शेतकरी दररोज चंदेल यांच्या शेताच्या बाजूला लागून असलेल्या पांदण रस्त्यांवरून आपल्या शेतीत ये-जा करतात. भाजपाचे चंदेल यांनी आपल्या मनमर्जीने त्यांच्या शेतालगत लागून असलेल्या रस्त्यावरून शेतकऱ्यांना ये-जा करण्यासाठी मज्जाव करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या समस्यांना घेऊन गावकऱ्यांनी वंचितचे नेते राजू झोडे यांच्या नेतृत्वात माननीय तहसीलदार बल्लारपूर यांना निवेदन देऊन पांदण रस्ता मोकळा करून देण्याची मागणी केली.
मागील कित्येक वर्षापासून गावातील शेतकरी सदर पांदण रस्त्यातून ये-जा करत शेतीचे काम करत होते. परंतु लखन सिंग चंदेल यांनी आपली शेती बालाजी कन्स्ट्रक्शन कंपनीला दिल्यामुळे त्यांनी आपल्या शेतीची मोजणी चुकीच्या पद्धतीने करून नकाशावरून पांदण रस्ता गहाळ केला. मोजणी केल्यानंतर चंदेल यांनी पांदन रस्ता संपूर्ण बंद केला त्यामुळे कळमना गावातील शेतकऱ्यांना आपल्या शेतीची वहीवाट करण्यासाठी कोणताही रस्ता नसल्यामुळे गावातील शेतकरी हवालदिल झालेला आहे. भाजपाचे चंदेल यांनी आर्थिक पाठबळाच्या जोरावर संबंधित प्रशासनाशी हात मिळवणी करून सुरु असलेल्या पांदण रस्ता बंद केला. ही बाब अतिशय गंभीर असून शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा शेती करण्यासाठी ये-जा करणारा पांदण रस्ता पूर्ववत सुरू करण्यात यावा अशी मागणी गावकऱ्यांनी प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली.
चंदेल यांच्या माध्यमातून बालाजी कंपनीने जो रस्ता हळप केलेला आहे तो ताबडतोब पूर्ववत सुरू करावा अन्यथा गावातील संपूर्ण शेतकऱ्यांना घेऊन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राजू झोडे यांनी प्रशासनाला दिला. निवेदन देताना वंचितचे नेते राजू झोडे, कैलाश शेडमाके मिलिंद मांढरे, मयुर साळवे, प्रदीप झांमरे, मारोती मडावी, सुधाकर आत्राम, सुनील उरकुडे, व प्रदिप धानोरकर तथा अन्य कार्यकर्ता व शेतकरी उपस्थित होते.