वर्धा/ आर्वी :संभाजी ब्रिगेड आर्वी च्या वतीने आज राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जयंती लोकराज्य दिन म्हणून थाटात साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष ऍड.सुरेंद्रजी जाणे तर प्रमुख अतिथी म्हणून मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष वीरेंद्र कडू,प्रशांत नेपटे,प्रल्हादजी देशभ्रतार,सामाजिक कार्यकर्त्या विजयाताई मुडे उपस्थित होत्या.
यावेळी महापुरुषांच्या प्रतिमेला हारार्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना वीरेंद्र कडू यांनी शाहू महाराजांच्या विचारांची समाजाला नितांत गरज असून खरं लोकराज्य अस्तित्वात आणण्यासाठी शाहू महाराजांचे कार्य प्रेरक ठरेल.असे प्रतिपादन केले.
समाजातील अस्पृश्यता समूळ नष्ट करण्यासाठी गंगाराम कांबळे सारख्या एका दलित व्यक्तीच्या चहाच्या टपरीवर जाऊन चहा पिणे हे त्याकाळातील क्रांतिकारी पाऊल होते असे मत विजयाताई मुडे यांनी मांडले.
असंघटित लोकांना एकत्रित आणत चळवळी मोठ्या प्रमाणात नेतृत्व करू शकतात.आता राजकीय,सामाजिक क्षेत्रात आपली भूमिका महत्त्वाची असणार आहे असे मत प्रल्हादजी देशभ्रतार यांनी व्यक्त केले.
प्रशांत नेपटे यांनी शाहू महाराजांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना संभाजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष प्रफुल क्षिरसागर यांनी राजर्षी शाहू महाराजांची जयंती ही लोकराज्य दिन म्हणून साजरी केली जावी.आगामी काळात शाहू महाराजांना अभिप्रेत लोकराज्य निर्माण करण्यासाठी संभाजी ब्रिगेड पक्षाला मोठी संधी राज्याचा राजकारणामध्ये निर्माण झालेली आहे.आजचा संघर्षच उद्याच्या यशाचा इतिहास लिहेल असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
अध्यक्षीय भाषण करतांना ऍड.सुरेंद्र जाणे यांनी आपण खचुन न जाता कुठल्याच परिस्थितीत आपल्या विचारांचा पासवर्ड न बदलता लढत राहिल्यास भविष्य आपलंच असेल हा विश्वास व्यक्त केला.
या कार्यक्रमाचे संचालन रवींद्र घाडगे यांनी तर आभार प्रा.विजय चौधरी यांनी मानले. यावेळी विविध सामाजिक संघटनांचे अरसलान खान, रुपचंदजी टोपले,विनोद पायले यांचेसह प्रमोद नागरे,प्रभाकर माळवे,वासेकर सर यांच्यासह मोठ्या संख्येने विविध मान्यवर,पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संभाजी ब्रिगेड चे तालुकाध्यक्ष रोहन हिवाळे,नरेश निनावे, शुभम राजे,निलेश घुगरे, पवन भोंबेकर, अर्षद राही,आकाश हिरेखन,सचिन राऊत,वैष्णवी जगताप,छाया बावणे आदींचे सहकार्य लाभले.