कोरोनामुळे पालक गमावलेल्या 468 बालकांना बालसंगोपनचा लाभ

 

वर्धा जिल्हा प्रतिनिधी //उमंग शुक्ला

बालकांना प्रति महिना 1100 रुपयांचे सहाय्य

जिल्ह्यात 96 बालकांचे शालेय शुल्क माफ

 कोरोना काळात 41 बाल विवाह थांबविले

वर्धा, दि.22 : कोरोनामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. या महामारीत काही बालकांना एक तर काही बालकांचे दोनही पालक हिरावल्या गेले. पालक गमावलेल्या बालकांना बाल संगोपन योजनेचा लाभ दिल्या जात आहे. जिल्हयातील 468 बालके या योजनेसाठी पात्र ठरले असून या सर्व बालकांना प्रति महिना 1 हजार 100 रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते.
जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्या अध्यक्षतेखाली आज आयोजित बैठकीत बालकांसाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांचा आढावा घेण्यात आला. यावेळी अपर पोलिस अधिक्षक यशवंत सोळंके, महिला व बाल विकास अधिकारी प्रशांत विधाते, आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प संचालक दिपक हेडाऊ, महिला व बाल विकासचे उपमुख्य अधिकारी श्री. मेसरे, प्राथमिक शिक्षणाधिकारी लिंबाजी सोनवने, माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री. जगताप, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी माधुरी भोयर आदी उपस्थित होते.
कोरोनाच्या पहिल्या आणि दुस-या लाटेत मोठया प्रमाणावर जिवीत हानी झाली. त्यामुळे जिल्हयातील अनेक बालकांना आपल्या पालकांना गमवावे लागले. 468 बालकांचे एक पालक गमावल्या गेले असून या बालकांना आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्यामूळे बालसंगोपन योजना या बालकांना लागू करण्यात आली आहे. त्यामुळे या बालकांना वयाच्या 18 वर्षापर्यंत प्रति महिना 1 हजार 100 रुपये अर्थसहाय्य नियमितपणे वितरीत करण्यात येत आहे.
एक किंवा दोन पालक गमावलेल्या बालकांचा आर्थिक भार कमी करण्यासाठी त्यांची शालेय फी माफीचा देखील निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार एक पालक गमावलेल्या 43 मुलांची फी शिक्षण विभागाकडून माफ करण्यात आली असून 53 बालकांची फी महिला व बाल विकास विभागाकडून भरण्यात आली आहे.
शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्यप्रवाहात आणने आवश्यक आहे. त्यामुळे अशा मुलांचा शोध घेऊन त्यांना शाळेत दाखल करा. यासोबतच मुलांची शालेय गुणवत्ता तपासण्याचे निर्देश यावेळी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी दिले. एकही बालक शाळाबाह्य राहू नये तसेच जिल्हयात बालकांचा कामगार म्हणुन वापर केल्या जाऊ नये. असे आढळल्यास सबंधितांवर कारवाईचे निर्देश देखील त्यांनी दिले.
कोरोना काळात 41 बाल विवाह थांबविले
कोरोना काळात सन 2020 ते 2022 या काळात महिला व बाल विकास विभागाच्या विशेष प्रयत्नाने तब्बल 41 बालविवाह थांबविण्यात आले आहे. यातील 36 बाल विवाह जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या माध्यमातून तर आर्वी तालुक्यात होणारे 4 बाल विवाह बाल संरक्षण कक्षाच्या सहकार्याने गावातील किशोरवयीन मुलींच्या माध्यमातून थांबविण्यात आले आहे. यातील सर्व बालकांना बाल कल्याण समिती समोर हजर करण्यात आले. तसेच त्यांचे समुपदेशन देखील करण्यात आले आहे.