जिल्ह्यात बोगस डॉक्टरांची विशेष शोध मोहिम मोहिम 5 जुलै पर्यंत राबविणार तीन विभाग संयुक्त कार्यवाही करणार 10 बोगस डॉक्टरांवर गुन्हे दाखल

 

वर्धा जिल्हा प्रतिनिधी // उमंग शुक्ला

वर्धा: जिल्हयात ठिकठिकाणी बोगस डॉक्टर कार्यरत असल्याने रुग्णांच्या जिवीतास या डॉक्टरांमुळे धोका संभवू शकतो. कायदेशिर मान्यता नसतांना सुरु असलेल्या अशा डॉक्टरांची विशेष शोध मोहिम संपूर्ण जिल्हाभर दि.5 जुलै पर्यंत राबविण्यात येत आहे. पोलिस, महसूल व आरोग्य विभाग संयुक्तरित्या ही शोध मोहिम राबविणार आहे. मोहिमेदरम्यान आढळणा-या अशा डॉक्टरांवर कारवाई केली जाते.
बोगस डॉक्टर शोध मोहिम जिल्हा स्तरीय पुनर्विलोकन समितीची बैठक जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, जिल्हा पोलिस उपअधिक्षक (मुख्यालय) आबुराव सोनवने, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राज पराडकर, कस्तुरबा रुग्णालय सेवाग्रामचे अधिक्षक डॉ. कलंत्री, आचार्य विनोबा भावे रुग्णालयाचे डॉ. कोडापे आदी उपस्थित होते.
कायद्याप्रमाणे खाजगी प्रॅक्टीसची परवाणगी असलेल्या डॉक्टरांनाच आपआपल्या पॅथीचे रुग्णालय चालविता येते. ब-याचदा परवाणगी नसतांना किंवा इतर पॅथीची प्रॅक्टीस केली जात असल्याचे दिसून येते. अशी प्रॅक्टीस बेकायदेशिर असल्याने अशा डॉक्टरांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई केली जाते. जिल्हयात ग्रामीण भागात असे बोगस डॉक्टर मोठया प्रमाणावर असण्याची शक्यता असते. त्यांचा शोध घेऊन कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी बैठकीत दिले.
बैठकीतील निर्देशाप्रमाणे उद्या दि. 22 एप्रिल पासुन बोगस डॉक्टर शोध मोहिमेस प्रारंभ होत आहे. ही मोहिम दि.5 जुलै पर्यंत राबविण्यात येतील. या मोहिमेत पोलिस विभाग, महसूल विभाग व आरोग्य विभागाच्या अधिक-यांचा समावेश असणार आहे. विशेषत: ग्रामीण भागात या मोहिमे अंतर्गत विशेष तपासणी केली जातील. बोगस डॉक्टरांचा शोध घेण्यासाठी आयएमए व निमा या डॉक्टर संघटनेच्या पदाधिका-यांचे देखील सहकार्य घेतले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 5 जुलै पर्यंत ही मोहिम राबविल्यानंतर पुढील टप्प्यात तीन महिन्यानंतर ही मोहिम राबविली जातील.
यापूर्वी आढळले 48 बोगस डॉक्टर
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने यापूर्वी राबविलेल्या मोहिमेत जिल्हयात 48 बोगस डॉक्टर आढळून आले होते. त्यातील काही डॉक्टर कायदेशिर परवाना नसलेले तर काही इतर पॅथींची प्रॅक्टीस करत असल्याचे आढळून आले होते. यातील 10 डॉक्टरांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. काही बोगस डॉक्टरांनी कारवाईच्या भितीने प्रॅक्टीस बंद केली असून इतर पॅथीची प्रॅक्टीस करणा-या डॉक्टरांनी आपल्या मुळ पॅथीच्या प्रॅक्टीसला प्रारंभ केला. पुढे इतर पॅथीची प्रॅक्टीस करणार नसल्याचे त्यांनी लेखी प्रतिज्ञापत्र दिले.