निरोगी आयुष्यासाठी योगा आवश्यक -खासदार रामदास तडस

 

 सेवाग्राम येथील जागतिक योग दिन

 पंतप्रधानांच्या भाषणाचे लाईव्ह प्रसारण

 योग दिनात हजारोंचा सहभाग

वर्धा, दि. 21 – योगाचे महत्व आज संपुर्ण जगाला समजले असून नियमित योग निरोगी आयुष्यासाठी आवश्यक आहे, असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी आज येथे केले.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व जागतिक योग दिनानिमित्त देशभरातील ७५ स्थळांमध्ये निवड करण्यात आलेल्या सेवाग्राम येथील चरखागृहात केंद्रीय संचार ब्युरो, क्षेत्रीय कार्यालय, पर्यटन संचालनालय, जिल्हा प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय, नेहरू युवा केंद्राच्या संयुक्त विद्यमाने जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी श्री.तडस अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, पोलिस अधिक्षक प्रशांत होळकर, उपवनसंरक्षक राकेश सेपट, पर्यटन संचालनालयाचे उपसंचालक प्रशांत सवई, क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत, उपजिल्हाधिकारी गणेश खताळे, जिल्हा युवा अधिकारी शिवधन शर्मा, जिल्हा क्रिडाअधिकारी लतिका लेकुरवाळे, पतंजली योग संस्थान वर्धाचे संजिवनी माने, राज्य योग परिषदेचे सोनाली शिरभाते प्रामुख्याने उपस्थित होते.
प्राचीन काळापासून आपल्या देशाला योग परंपरा लाभली असल्याचे सांगून खासदार तडस म्हणाले, आज भारताने योगाच्या माध्यमातून संपुर्ण विश्वाला निरोगी आयुष्याचे महत्व पटवून दिले आहे. निरोगी आयुष्य जगण्यासाठी प्रत्येक नागरीकांनी योगाला आपल्या आयुष्याचा भाग बनवावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार म्हणाल्या, भारतीय संस्कृतीचे जगाला वरदान आहे. योगा या प्रकारात विविध आसन हे भाग आहेत. शिस्तबध्द आयुष्य जगण्यासाठी केवळ याला आसन म्हणून न बघता जिवन जगण्याची कला म्हणून आपला दृष्टीकोण ठेवणे आवश्यक आहे, तसेच नागरीकांनी नियमित योग करून आपले आयुष्य निरोगी बनवावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचे एलएडी स्क्रिनच्या माध्यमातून लाईव्ह प्रसारण करण्यात आले. त्यानंतर संजिवनी माने आणि सोनाली शिरभाते यांनी उपस्थित नागरीकांना विविध आसनांच्या माध्यमातून योगाचे प्रशिक्षण दिले. नागरीकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून विविध आसनाचे प्रात्याक्षिक केले.
संचालन आरजे रोहित यांनी केले. तर आभार क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, क्षेत्रीय संचार ब्युरोचे संतोष यादव, क्रिडा अधिकारी अनील निमगडे, पतंजली योग संस्थानचे दिपक भुतडा, विजय धात्रक, वनिता चलाख, महेश कहारे, पोर्णिमा धात्रक, वर्षा मारबदे, रंजीता भातकुलकर, प्रिया बाभुळकर, महादेश किनकर, ज्योती शेट्टे, संगीता ईमले, चंदा कुंबलवार, उषा लाकडे, कल्पना शेंद्रे, अनिता, प्रज्ञा सुर्यवंशी, विद्या पेंडके, माधुरी शिवणकर, सारीका काळे, मंदा ढगे, भैय्या निखाडे, नितीन सुकळकर, राहुल वंजारे, श्री. बोधे यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला पतंजली योग संस्थान वर्धा, राज्य योग परिषद, वर्धा यांचे सहकार्य लाभले.