जिल्ह्याच्या शहरी भागात 11 हजारावर शौचालयांचे बांधकाम

 

जिल्हा प्रतिनिधी //उमंग शुक्ला

स्वच्छ भारत मिशन अभियान

बांधकामासाठी लाभार्थ्यांना अनुदान

शौचालय बांधकामाची उद्दिष्टपूर्ती

वर्धा, दि. 15 : केंद्र शासनाच्या वतीने स्वच्छ भारत मिशन मोठया प्रमाणावर संपूर्ण देशात राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत वैयक्तिक शौचालय बांधकामाची मोहिम हाती घेण्यात आली होती. जिल्हयात शहरी भागात बांधकामाच्या उद्दिष्टांची शतप्रतिशत पुर्तता झाली असून 11 हजार 964 शौचालये बांधून झाले आहे.
विविध प्रकारच्या आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी वैयक्तिक व सामुहिक स्वच्छता अतिशय महत्वाची आहे. उघड्यावर शौचास बसल्याने विविध प्रकारच्या रोगराईस प्रोत्साहन मिळते. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागात अशा प्रकारच्या रोगराईस प्रतिबंध घालण्यासाठी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत मोठया प्रमाणावर वैयक्तिक शौचालय बांधकामाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. सुरवातीस अल्प प्रतिसाद लाभलेल्या अशा बांधकामास नंतरच्या काळात नागरिकांचा मोठया प्रमाणावर प्रतिसाद तर लाभलाच शिवाय शौचालयाचा वापर करण्याचे प्रमाण देखील वाढले आहे.
जिल्ह्यात वर्धा, हिंगणघाट, आर्वी, पुलगाव, सिंदी रेल्वे, देवळी या सहा नगर परिषदासह आष्टी, सेलू, समुद्रपूर, कारंजा या चार नगर पंचायती अशा एकुण दहा शहरांमध्ये 11 हजार 964 शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट होते. उद्दिष्टातील सर्व शौचालये बांधून पुर्ण झाले असून या शौचालयाचा वापर देखील केल्या जात आहे.
बांधण्यात आलेल्या शौचालयांमध्ये वर्धा नगर परिषदेच्या क्षेत्रात 951 शौचालयाचा समावेश आहे. हिंगणघाट नगर परिषद 3 हजार 7 शौचालय, आर्वी नगर परिषद 1 हजार 860 शौचालय, देवळी नगर परिषद 1 हजार 125 शौचालये, पुलगाव नगर परिषद 870 शौचालये, सिंदी नगर परिषद 1 हजार 92 शौचालये, कारंजा नगर पंचायत 512 शौचालये, आष्टी नगर पंचायत 1 हजार 260 शौचालये, सेलू नगर पंचायत 859 शौचालये तर समुद्रपूर नगर पंचायतीच्या क्षेत्रात 428 शौचालये याप्रमाणे 11 हजार 964 वैयक्तिक शौचालयाचा समावेश आहे.
शौचालये बांधकामासाठी मोठया प्रमाणावर जनजागृती देखील करण्यात आली. केंद्र शासनाच्या वतीने प्रती शौचालय 12 हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले. याशिवाय नगर परिषदांनी देखील राज्य शासनाकडील किंवा त्यांना वित्त आयोगातून मिळालेल्या निधीतून लाभार्थ्यांना प्रत्येकी 5 हजार रुपयांचे अनुदान लाभार्थ्यांना उपलब्ध करुन देण्यात आले.