पीएम किसानच्या लाभार्थ्यांनी ई-केवायसी करण्याचे आवाहन

 

जिल्हा प्रतिनिधि // उमंग शुक्ला

वर्धा: प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या पोर्टलवर नोंदणीकृत लाभार्थ्यांनी ई-केवायसी करणे आवश्यक आहे. ज्या शेतक-यांनी ई-केवायसी केली नसेल अशांनी दि.31 जुलै पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रधानमंत्री किसान योजनेच्या सहभागासाठी शेतक-यांना पोर्टलवर नांदणी करावी लागते. नोंदणी केलेल्या शेतक-यांना केवायसी करणे आवश्यक आहे. या पोर्टलवर नोंदणी केलेल्या शेतक-यांच्या अहवालावरुन केवायसी अत्यल्प प्रमाणात झाली असल्याचे दिसून येत आहे. शेतक-यांना ही प्रक्रिया पूर्ण करता यावी यासाठी शासनाने दि.31 जुलै पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
त्याअनुषंगाने ई केवायसी करण्यासाठी लाभार्थ्यांना ओटीपी किंवा बायोमॅट्रीक हे पर्याय उपलब्ध करुन देण्यात आले आहे. त्यानुसार प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या http://pmkisan.gov.in या संकेत स्थळावरील Farmer Corner या टॅब मध्ये किंवा पीएम किसान ॲपमध्ये ओटीपी व्दारे लाभार्थ्यांना मोफत ई-केवायसी करता येईल. ग्राहक सेवा केंद्रावर प्रमाणिकरण बायोमॅट्रीक पध्दतीने ई-केवायसी करता येईल. ग्राहक सेवा केंद्रात ही प्रक्रिया करण्यासाठी प्रती लाभार्थी प्रती बायोमॅट्रीक प्रमाणिकरण 15 रुपये इतका दर निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनी दि.31 जुलै पुर्वी ई-केवायसी प्रमाणिकरण करुन घ्यावे, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा पीएम किसान योजनेच्या नोडल अधिका-यांनी कळविले आहे.