नगरपंचायतची कचरा व्यवस्थापन प्रक्रिया जनावरांच्या जिवांवर”

 

स्वच्छ सर्वेक्षणात नामांकित व मोठ्या प्रमाणत नागरिकांत स्वच्छतेचा संदेश देत असलेली नगर पंचायत कारंजा सध्या कचरा व्यवस्थापनाबाबत उदासीन असल्याचे दिसत आहे.

धिरज कसारे तालुका प्रतिनिधी कारंजा

शहराला लागूनच असलेल्या नगर पंचायतच्या कचरा व्यवस्थापनाच्या जागेत गाई- गुरे प्लास्टिक खात असल्याचे दिसत आहे. कचरा व्यवस्थापनाच्या जागेत तुटलेल्या वॉल कुंपणामधून गायी – गुरे आता मध्ये जातात, असे आढळून आले.

रस्त्यावर चरणारी गाई-गुरे नगर पंचायतच्या कचरा व्यवस्थापनाच्या जागी टाकलेल्या प्लास्टिकचे बळी ठरतील का? प्राण्यांचा अकस्मात मृत्यू होण्यासाठी प्लास्टिक हा महत्त्वाचा घटक आहे. केवळ प्लास्टिकच नाही तर उकिरड्यावरील कचऱ्यामधून लोखंडाचे तुकडे, खिळेसुद्धा गायींच्या पोटात जातात. घोडे किंवा इतर प्राण्यांचे ओठ, दात संवेदनशील असतात त्यामुळे त्यांना काय खायचे नाही हे त्यांना कळते. गायींच्या बाबतीत ही शक्यता नसल्याने गवताला बांधलेल्या लोखंडी ताराही त्यांच्या पोटात जाऊ शकतात. टोकदार वस्तूंमुळे त्याचे आतडे फाटत जाते.

नगर पंचायत प्रशासानाद्वारे दिवसभर शहरातील कचरा जमा करून कचरा व्यवस्थापनाच्या जागेत नेऊन टाकतात. परंतु, त्या कचऱ्यामध्ये जनावरे चरताना दिसून येऊन सुध्दा प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे.