राज्यसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात राष्ट्रपती राजवट!

 

महाराष्ट्रात १० जुनला होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीनंतर केंद्र सरकार राज्यावर राष्ट्रपती राजवट लादेल, असा धक्कादायक दावा इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी मंगळवारी केला. सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर अपक्ष आमदारांचा रोष यासाठी कारणीभूत ठरू शकतो, असे भाकित देखील त्यांनी वर्तवले.याच रोषाचे भांडवल करीत केंद्रातील भाजप सरकार त्यांची राजकीय खेळी खेळेल.गेल्या काही दिवसांमध्ये अपक्ष तसेच सरकारला समर्थन देणाऱ्या आमदारांनी त्यांची नाराजी जाहीररीत्या बोलून दाखवली आहे. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने नवीन राजकीय समीकरणे जुळण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याचे पाटील म्हणाले.

राज्यात २८८ आमदार आहेत. यातील ५५ आमदार शिवसेनेचे, ५३ आमदार राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि ४४ आमदार कॉंग्रेसचे आहे.विरोधी पक्ष भाजपकडे १०६ आमदार आहेत. या प्रमुख पक्षांसह बहुजन विकास आघाडी, समाजवादी पार्टी, एआयएमआयएम आणि प्रहार जनशक्ती पार्टी कडे प्रत्येकी २ आमदार आहेत. यासोबतच सीपीआय (एम), पीडब्ल्यूपी, स्वाभीमानी पार्टी, राष्ट्रीय समाज पार्टी, जनसुराज्य पार्टी आणि क्रांतीकारी शेतकरी पार्टी यांचा प्रत्येकी १ आमदार आहेत. जवळपास १३ स्वतंत्र आमदार असून यातील बरेच आमदार भाजपला समर्थन देतील असा दावा पाटील यांनी केला. याच आधारावर भाजपकडून राज्यसभा निवडणुकीनंतर सत्तास्थापनेचा दावा अथवा राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली जावू शकते.

दुसरीकडे केंद्र सरकारने राज्यातील दोन मंत्र्यांविरोधात सीबीआय तसेच ईडी चौकशीचे आदेश दिले आहेत.अनिल देशमुख आणि नबाब मलिक भष्ट्राचाराच्या आरोपाखाली तुरूंगातच आहेत.या मंत्र्यांच्या तुरुंगवारीमुळे सत्ताधाऱ्यांच्या प्रतिमेला तडा गेला आहे. अशात यंदाची निवडणूक दोन दशकांनंतर बरीच रंगतदार ठरणार असल्याचे पाटील म्हणाले. अपक्ष आमदारांसह काही लहान पक्षांकडून भाजपला समर्थन मिळाले तर भाजपचा उमेदवार निवडून येईल, असे पाटील म्हणाले.