वर्धा, दि. 6 – निसर्गाची हानी म्हणजे मानवी संस्कृतीची हानी आहे, पर्यावरणाच्या संरक्षणासाठी सर्वांनी एकजुटीने पर्यत्न करून निसर्गाची काळजी घेतली, तरच भविष्यात मानवी संस्कृतीचे संरक्षण होऊ शकेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी केले.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या क्षेत्रीय लोक संपर्क ब्युरो, वर्धा, आणि जैव प्रसंस्करण एवंम जडीबुटी विभाग महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकीकरण संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने मगनवाडी येथील महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकीकरण संस्थानच्या सभागृहात आयोजित केलेल्या दोन दिवसीय पर्यावरण दिन जनजागृती विशेष प्रचार अभियान कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.
याप्रसंगी महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकीकरण संस्थानचे कार्यालय प्रमुख तथा उपसंचालक रविकुमार कंडास्वामी, महात्मा गांधी आयुर्वेद महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. वैशाली कुचेवार, माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या क्षेत्रीय लोक संपर्क ब्युरो, वर्धाचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी देशभ्रतार म्हणाल्या की, आपण काही वाईट काम केले तर आपले वाईट होते, अशी भारतीय संस्कृतीत एक धारणा आहे. त्याचप्रमाणे मानवाने अंगीकृत केलेली चुकीची कृती पर्यावरणाचा समतोल ढासळण्यासाठी कारणीभुत ठरत आहे. याची परतफेड निसर्गात होणा-या ब-याच बदलांच्या माध्यमातून मानवाला अनुभवता येत आहे. प्रत्येक व्यक्ती हा निसर्गावर अवलंबून आहे. त्यामुळे पर्यावरणाच्या रक्षणाची सामुहिक जबाबदारी सर्वांवर आहे. सर्वांनी पर्यावरण व निसर्गाच्या रक्षणासाठी पुढे येऊन आपले योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
डॉ. कुचेवार म्हणाल्या की, निसर्ग जे देतो, तेच आपल्याजवळ आहे, त्यामुळे निसर्गाला आपणही दिले पाहिजे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी आपण पुढाकार घेऊन त्याची सुरूवात स्वतः पासून करावी, असे आवाहन केले. प्रास्ताविकात हंसराज राऊत यांनी केले. प्रत्येकांने स्वतःपासून सुरूवात करून किमान एका वृक्षाची लागवड करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. श्री. रविकुमार यांनी आपल्याला औद्योगिकीकरणाची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे पर्यावरणाचीही आवश्यकता आहे, असे सांगितले.
यावेळी रंगधुन कला मंच नागपूरच्या समीर दंदारे व त्यांच्या चमुने पर्यावरण या विषयावर पथनाट्य सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. संचालन जैव प्रसंस्करण एवंम जडीबुटी विभागाचे सह समन्वयक डॉ. जयकिशोर छांगाणी यांनी केले. तर आभार वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. अपराजिता वर्धन यांनी केले. दोन दिवस चाललेल्या कार्यक्रमात विविध स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांमध्ये महात्मा गांधी आयुर्वेद महाविद्यालय, जी. एस. कॉलेज, जे.बी. सायन्स कॉलेज, बजाज कॉलेज, अग्रग्रामी कॉन्व्हेंट, लोक महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते.
विजेत्यांना यावेळी पुरस्कार वितरण करण्यात आले. त्यात वक्तृत्व स्पर्धेत प्रथम बक्षीस हरविंदरसिंग बावरी, द्वितीय अनिरूध्द घुले, तृतीय सायली मानकर, चतुर्थ भक्ती छांगाणी, पाचवे उत्तम पाटील तर सहावे बक्षीस पुर्वा जमनारे यांना देण्यात आले. चित्रकला स्पर्धेतील प्रथम बक्षीस भक्ती छांगाणी, द्वितीय वैदेही वंजारी, तृतीय सायली मानकर, चतुर्थ प्राज्योती कुबडे, पाचवे नैतीक वर्मा तर सहावे बक्षीस पुर्वा वाढनकर यांना देण्यात आले. रांगोळी स्पर्धेतील प्रथम बक्षीस श्वेता अंबुलकर, द्वितीय निलाश्री देशमुख, तृतीय शिवानी देठे, चतुर्थ पायल चाफले, पाचवे दर्शना बडे तर सहावे बक्षीस करिष्मा गुप्ता यांना मान्यवरांच्याहस्ते देण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो, वर्धाचे संजय तिवारी, संतोष यादव, महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकीकरण संस्थानच्या डॉ. छांगाणी, डॉ. अपराजिता, मोहन कापसे, विनस तुप्टे, निकीता, रवि खाडे, डिंकेश ढोले यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले.