जिल्हा व सत्र न्यायालयातर्फे जागतिक सायकल दिवस साजरा

 

चंद्रपूर, दि. 6 जून: संयुक्त राष्ट्र परिषदेने 3 जून हा दिवस जागतिक सायकल दिन म्हणून घोषित केला आहे. या दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसेच जिल्हा व सत्र न्यायालय, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि. 3 जून रोजी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

सायकल रॅलीचे निर्गमन जिल्हा व सत्र न्यायालय, चंद्रपूर इमारतीच्या प्रांगणातून झाले. जटपुरा गेट-गिरणार चौक-गांधी चौक-आझाद बगीचा-जटपुरा गेट या मार्गाने रॅलीचे भ्रमण होऊन जिल्हा न्यायालयाच्या प्रांगणात रॅलीची सांगता झाली. सदर सायकल रॅलीमध्ये जिल्हा न्यायालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसह चंद्रपूर शहरातील मामला सायकल ग्रुप, चांदा रायडर्स ग्रुप, गो ग्रीन सायकल ग्रुप आदी समूहातील उत्साही व नामवंत सदस्यांनी सहभाग घेतला. त्यामध्ये चंद्रपूर शहरातील डॉ. मंगेश गुलवाडे, अनिल टहलियानी, शकीर उकाणी, बंटी बोधवाणी, मनीष मुलचंदानी, कुलदीप कपूर, संदीप बच्चूवार, मोहम्मद काचंवाला, अमोल जवादे, अमित मुत्यालवार, राकेश ऊधवानी, सुनील जुनघरे आदी सायकल प्रेमींचा समावेश होता.

याप्रसंगी जिल्हा न्यायालयाच्या प्रमुख न्यायाधीश श्रीमती अग्रवाल यांनी प्रमुख उपस्थिती दर्शविली. शरीर व पर्यावरण स्वास्थ्यासह इतर अनेक फायद्यांकरीता सायकल चालविणे हे किती लाभदायक आहे, याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले व रॅलीला हिरवी झेंडी दाखविली. त्याचप्रमाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे प्रभारी सचिव एम. एस. काळे यांनी सायकल रॅलीच्या आयोजनाकरीता सर्वतोपरी प्रयत्न केले. रॅलीच्या यशस्वितेकरीता सर्व न्यायिक अधिकारी तसेच जिल्हा न्यायालय आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.