बिटुमिनस कॉंक्रिट पेविंगनंतर लोणीपासून रस्ता वाहतुकीसाठी खुला

 

अमरावती, ता. ४ : अमरावती-अकोला राष्ट्रीय महामार्ग-६ वरील विश्वविक्रमी बिटुमिनस कॉंक्रिट पेविंग कार्याचा आजचा दुसरा दिवस सुरू आहे. पहिल्या २४ तासात तयार करण्यात आलेला जवळपास १० ते १२ किलोमीटरचा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला आहे. यामुळे या महामार्गावरील वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होत आहे.जवळपास एक दशक प्रचंड त्रास सोसल्यानंतर,या मार्गावरील वाहन चालकांना हा एक सुखद धक्का आहे. महामार्गाच्या या छोट्याशा तुकड्यावरील कामाची गुणवत्ता बघून अनेक वाहन चालक आणि प्रवाशांनी आनंद व्यक्त केला.

आज (ता. ४) सायंकाळी ५ वाजेपर्यंत, १३००० रनिंग मीटर एवढे बिटुमिनस कॉंक्रिट पेविंग करण्यात आले आहे. म्हणजेच, दोन लेन मिळून,२६ किलोमीटर एवढे बिटुमिनस कॉंक्रिट पेविंगचे काम पूर्णत्वास गेले आहे.

आज रात्री पर्यंत हे कार्य अकोला जिल्ह्यात पोहोचेल.राजपथ इन्फ्राकॉन प्रा. लि. चे सर्व अधिकारी, कर्मचारी मोठ्या उत्साहाने विश्वविक्रम करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. सोबतच रस्त्याची गुणवत्ता तपासण्यासाठीसुद्धा लॅब टेक्निशियन,गिनीज बुक रेकॉर्डचे समन्वयक आणि त्यांची संपूर्ण समर्पित चमू २४ तास देखरेख करीत आहेत.

*मान्यवरांच्या भेटी*

अमरावती-अकोला राष्ट्रीय महामार्ग-6 वरील जागतिक विक्रमी कार्याला प्रारंभ झाल्यानंतर,दुसऱ्या दिवशी आमदार वसंत खंडेलवाल, राधाकृष्ण फायबर्सचे अध्यक्ष, रवी गोयनका, प्रयोगशील शेतकरी आणि बॅरिस्टर रामराव देशमुख यांचे नातू,जयसिंगराव देशमुख, अमरावती मतदारसंघ-28 च्या आमदार सुलभाताई संजय खोडके आणि ज्येष्ठ नेते संजयजी खोडके यांच्यासह अनेक मान्यवरांनी कार्यस्थळी भेटी देऊन,या कामामुळे अमरावती विभागातील लोकांचा त्रास कमी होण्यास मदत होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.या सर्वांनी कामाच्या प्रगतीवर चर्चा करून शुभेच्छा दिल्या.

राजपथ इंफ्राकॉनचे व्यवस्थापकीय संचालक, जगदीश कदम यांनी सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.