बल्लारपूर( राजू वानखेडे: तालुका प्रतिनिधि)
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वसामान्य जनता, शेतकरी, कामगार, छोटे-मोठे व्यापारी यांची आर्थिक स्थिती पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे. हाताला काम नसल्यामुळे व लाकडावूनमुळे सर्वसामान्य जनतेचे वीज बिल थकीत आहे. तरी सरकारने याचा गंभीर विचार करून विज बिल तात्काळ माफ करावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडी द्वारा करण्यात आली.
सरकारने या महामारी मुळे लॉकडाऊन केले होते त्यामुळे सर्व कामधंदे ठप्प पडलेले होते. त्यातच भरमसाठ वीज बिल आल्याने सर्व सामान्य गोरगरीब जनतेला विद्युत बिल भरणे कठीण झालेले आहे. वीज वितरण कंपनीचे कर्मचारी विद्युत बिल न भरल्यामुळे राजरोसपणे विद्युत कनेक्शन कापत आहेत.विज बिलासोबत स्थिर आकार, वहन आकार, वीज शुल्काच्या माध्यमातून जनतेची सर्रास लूट सुरू आहे. हे सर्व आकार रद्द करून विज बिल देण्यात यावे.सरकारने शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करण्याची घोषणा केली होती ते सरसकट माफ करावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडी करून करण्यात आली.
वरील मागणी तात्काळ मान्य करण्यात आली नाही तर वंचित बहुजन आघाडी या विरोधात तीव्र आंदोलन करेल असा इशारा राजू झोडे यांनी वीज वितरण कंपनीला व सरकारला दिला. निवेदन देतांना वंचित बहुजन आघाडीचे नेते राजू झोडे, बंडू ढेंगरे, शशिकांत मेश्राम, सुभाषभाऊ थोरात, कृष्णा पेठकावार, विष्णू चोपडे, तनुजाताई रायपुरे तथा वंचित बहुजन आघाडीचे अन्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.