बल्‍लारपूर शहरातील पहिल्या डिजिटल शाळेच्‍या नविन इमारतीसाठी ३ कोटी ३० लक्ष रू. निधी मंजूर आ.सुधीर मुनगंटीवार यांच्‍या प्रयत्नातुन समृद्ध संगणकीय शैक्षणिक दालन उपलब्ध होणार

 

बल्लारपूर (राजू वानखेडे: तालुका प्रतिनिधि)

विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने बल्‍लारपूर नगर परिषदेच्‍या सुभाषचंद्र बोस या शहरातील पहिल्या डिजिटल शाळेच्‍या नविन इमारत बांधकामासाठी ३ कोटी ३० लक्ष रू. निधी मंजूर करण्‍यात आला आहे. राज्‍यातील नगर परिषदांना वैशिष्‍टयपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान देण्‍याच्या योजनेअंतर्गत आ. सुधीर मुनगंटीवार यांनी प्रयत्‍न करून बल्‍लारपूर नगर परिषदेतील सुभाषचंद्र बोस डिजिटल शाळेच्‍या नविन ईमारतीसाठी निधी मंजूर केला आहे.

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने बल्‍लारपूर शहराने विकासाचे विविध टप्‍पे अनुभवले आहे. त्‍यामुळे बल्‍लारपूर शहराचा चेहरामोहराच बदलला आहे. विकासकामांची एक मोठी श्रृंखलाच या शहरात तयार झाली आहे. या विकासकामांच्‍या श्रृंखलेत आता नव्‍याने सुभाषचंद्र बोस डिजिटल शाळेच्‍या नवीन इमारतीची भर पडत आहे. ही डिजिटल शाळा आपले स्वप्न आहे, यामुळे ज्ञानदानाच्‍या कार्याला अधिक गती मिळेल संगणकीय युगाच्या स्पर्धेत बल्लारपूरकर विद्यार्थी नाव कमावतील असा विश्‍वास आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्‍यक्‍त केला आहे. सदर बांधकामास ३ कोटी ३० लक्ष रू. निधी वितरीत करण्‍यास नगर विकास विभागाच्या १६ जून २०२१ रोजीच्या शासन निर्णयानुसार मंजूरी देण्‍यात आली आहे.

बल्‍लारपूर शहरामध्‍ये विकासकामांच्‍या श्रृंखलेत उपविभागीय अधिकारी कार्यालयाची निर्मीती, तहसिल कार्यालय इमारतीचे बांधकाम, पंचायत समिती इमारतीचे बांधकाम, विश्रामगृहाचे बांधकाम, डायमंड कटींग प्रशिक्षण केंद्र, सुसज्‍ज नाटयगृह, विमानतळासारखे सुंदर बसस्‍थानक, राजवैभवी प्रवेशद्वाराची निर्मीती, स्‍मार्ट पोलिस स्‍टेशन, छटपूजा घाट, मुख्‍य मार्गांचे सिमेंटीकरण, डॉ श्‍यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयाची निर्मीती, अत्‍याधुनिक भाजी मार्केटचे बांधकाम, ई-वाचनालय, बालोद्यानाची निर्मीती, रेल्‍वे स्‍टेशनचे सौंदर्यीकरण, नगर परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम अशी विविध विकासकामे अंतर्भूत आहेत .आता सुभाषचंद्र बोस डिजिटल शाळेच्‍या नविन इमारतीच्या माध्यमातून बल्लारपूर च्या शैक्षणिक क्षेत्रात नवे दालन उपलब्ध होणार आहे .