– अ.भा.आ.वि.प युवा जिल्हाध्यक्ष भाग्यश्री लेखामी यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र तो’ निर्णय गडचिरोलीची दारुबंदी कमकुवत करणारा

 

प्रतिनिधी //अंकुश पुरी

गडचिरोली : चंद्रपुर जिल्ह्यातील दारुबंदी उठवीण्याचा तो निर्णय गडचिरोली जिल्ह्यातील प्रभावी दारूबंदी कमकुवत करणारा आहे. या निर्णयाचा आम्ही निषेध करीत असून आदिवासी जनतेला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गडचिरोली जिल्हा दारूमुक्त करावा, अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे गडचिरोली जिल्हा युवा जिल्हाध्यक्ष तथा ग्रामपंचायत कोठीच्या सरपंच भाग्यश्री लेखामी यांनी केली आहे. यासंदर्भात लेखामी यांनी राज्यपाल, मुख्यमंत्री, आदिवासी विकास मंत्री व पालकमंत्री यांना पत्र लिहिले आहे.
लेखामी यांनी पत्रात म्हटले आहे की, चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व सामान्य जनतेच्या अथक प्रयत्नाने लाखोंच्या संख्येने कुटुंब उध्वस्त करणारी दारू विक्री कायदेशीर मार्गाने बंद करण्यात आली होती. परंतु महाराष्ट्र शासनाने जनभावनांचा विचार न करता राजकीय फायद्यासाठी सदर दारुबंदी हटवली. त्याचे दुष्परिणाम निश्चितच आमच्या गडचिरोली जिल्ह्यावर पडणार आहेत. सदर दारुबंदी हटविण्यासंदर्भातील निर्णयाचा आम्ही निषेध करतो.
चंद्रपुर जिल्हा गडचिरोली लगत असल्याने चंद्रपुरची दारुबंदी उठविल्यामुळे चोरट्या मार्गाने जिल्ह्यात दारूविक्रीला पुन्हा एकदा उधान येणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील दारुबंदीच्या प्रभावीपणे अंमलबजावणीसाठी गावागावातिल महिलांनी व सामाजिक संघटनानी पुढाकार घेतला आहे. ती दारुबंदी आणखी मजबूत होण्याऐवजी कमकुवत होणारा सदर निर्णय आहे.
गडचिरोली मधील बहुसंख्य असलेले आदिवासी लोक या दारूमुळे आधीच देशोधडीला लागले आहेत. आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन खरोखरच कटिबद्ध असेल तर गडचिरोली जिल्हा दारुबंदीसहित दारूमुक्त करण्यासाठी प्रयत्न करावे. चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी कायम ठेवावी व गडचिरोलीच्या दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी करावी. दुसऱ्या जिल्ह्यातील दारू अवैधरित्या गडचिरोली जिल्ह्यात येऊ नये, याकरिता कडक पाऊल उचलावे. अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशारा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे गडचिरोली जिल्हा युवा जिल्हाध्यक्ष भाग्यश्री लेखामी यानी दिला आहे.