शासन आपल्या दारी अभियानाला विक्रमगड तालुक्यात उस्फुर्त प्रतिसाद.

 

प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत सरकारी योजनांचा लाभ पोहोचवण्यात यावा या हेतुने शासकीय योजना सुलभीकरण अभियान राबवण्याचा निर्धार राज्य सरकारच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यातील विविध शासकीय योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्यासाठी “शासन आपल्या दारी” हे अभियान राबवण्यात येत आहे.
याचाच एक भाग म्हणून नुकतेच विक्रमगड हायस्कूल येथे या अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन विक्रमगड तहसीलदार चारुशीला पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी विक्रमगड नगरपंचायत उपनगराध्यक्ष महेंद्र पाटील, मुख्याधिकारी अजय साबळे, हायस्कूलचे प्राचार्य घोलप सर, तहसील व नगरपंचायत कार्यालयातील कर्मचारी वर्ग व नागरिक उपस्थित होते.
या अभियानामार्फत विविध शासकीय योजनांचा नागरिकांना लाभ मिळवून देण्यासाठी तालुक्यातील तहसील, पंचायत समिती, कृषी विभाग, आरोग्य विभाग, नगरपंचायत विभाग कार्यरत होते. यावेळी सर्व विभागांनी शासकीय योजनेबद्दल नागरिकांना माहिती दिली. विक्रमगड नगरपंचायत मार्फत प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजना, जन्म मृत्यू दाखले, प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजना यांना प्रमाणपत्र वाटप, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) ,दिव्यांग लाभार्थ्यांना सहाय्य या जनकल्याणकारी योजना बाबत माहिती देऊन अर्ज भरण्यात आले.
या कार्यक्रमाला संदीप पावडे पशुसंवर्धन व कृषी सभापती जिल्हा परिषद पालघर यांनी भेट देऊन “शासन आपल्या दारी “या अभियानाबद्दल नागरिकांना माहिती दिली व आयोजित कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. या कार्यक्रमात तहसीलदार चारुशीला पवार, कृषी व पशुसंवर्धन सभापती संदीप पावडे, विक्रमगड नगरपंचायत उपनगराध्यक्ष महेंद्र पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते नागरिकांना नवीन रेशन कार्ड व दाखल्यांचे वाटप करण्यात आले.
या शिबिराराचा लाभ विक्रमगड तालुक्यातील सुकसाळे, यशवंत नगर ,खांड ,माण औदा ,सवादे, गडदे ,डोल्हारी खुर्द ,नागझरी, संगमनगर येथील नागरिकांनी घेतला.