सरकारने वाढविलेल्या खताच्या किंमती कमी कराव्या-राजु झोडे केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत असल्याचा आरोप वंचितचे नेते राजु झोडे नी केला

 

बल्लारपूर (राजू वानखेडे: तालुका प्रतिनिधि)

केंद्र सरकारने खतांच्या किमतीत व शेतीवरील संसाधनाच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ केल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. खताच्या किमतीत पन्नास टक्क्याहून अधिक वाढ केंद्र सरकारने केलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खत विकत घेणे कठीण झालेले आहे. अशातच कोरोना महामारीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले असून केंद्र सरकार खतांच्या व शेतीवरील संसाधनाच्या मूल्य दरात वाढ करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम सरकार करत आहे. असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते राजू झोडे यांनी केंद्र सरकारवर केला.
सध्याचे भाजपा प्रणित केंद्र सरकार हे शेतकरीविरोधी असून खते, बी-बियाणे व शेतीवरील अवजारांच्या मूल्य दरात वाढ करून शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याच्या प्रयत्नात आहे. डिझेलच्या वाढत्या किमती, खतांच्या व शेती अवजारांच्या वाढत्या किमती यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे परंतु शेतकऱ्यालाच आज जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाचा फटका शेतकऱ्याला बसत असून एकीकडे केंद्र सरकार दोन हजार रुपये देते तर त्याच शेतकऱ्यांकडून लाखो रुपयांची वसुली करून शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडते. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे होत असलेले नुकसान हे फार भयावह आहे. त्यामुळेच केंद्र सरकारने खते, बी-बियाणे व शेतीवरील अवजारे यांच्या किमती तात्काळ कमी कराव्या या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते राजू झोडे यांच्या नेतृत्वात यांनी प्रधानमंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले.
वाढलेले खताचे दर व शेती वरील अवजाराच्या किमती कमी करण्यात आल्या नाही तर या विरोधात वंचित बहुजन आघाडी राज्यभर तीव्र आंदोलन करेल असा इशारा निवेदनात देण्यात आला. निवेदन देताना वंचित चे नेते राजू झोडे, संपत कोरडे, सचिन पावडे, नवीन डेविड, भुषण पेटकर, जॉकिर खान ,प्रदीप झांबरे, चेतन वासनिक तथा अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.